श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि सरकारविरोधी आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात आतापर्यंत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने देशाच्या तिन्ही सैन्यांसाठी आदेश जारी केले आहेत.
कोणी सार्वजनिक मालमत्तेची लूट केली किंवा हिंसक निदर्शने केली तर त्याला गोळ्या घालाव्यात असे आदेश सैन्याला देण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ आता पोलिसांनाही तसेच आदेश देण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान किंवा आंदोलकांकडून जीवाला धोक्याची परिस्थिती असल्यास गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
श्रीलंकेत उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. आर्थिक संकटानंतर श्रीलंकेत हिंसाचार उसळला आहे. सरकार समर्थक आणि सरकारविरोधी हिंसेनंतर श्रीलंकेची राजधानी कोलंबोत सैन्य तैनात करण्यात आलं असून कर्फ्यू लावण्यात आला आहे.
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी जनतेला हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केलं. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आव्हानांवर मात करण्यासाठी श्रीलंकेच्या नागरिकांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर परिस्थिती बिघडली. राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर राजपक्षे समर्थक नेत्यांविरोधात व्यापक हिंसाचार सुरू झाला.
श्रीलंकेतील संघर्ष जाणून घ्या विस्ताराने : https://upscgoal.com/crisis-in-sri-lanka/