राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीही निर्माण झाली. राज्यात झालेल्या या मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळांवरही मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता आगामी काही दिवसात राज्यातील हवामान, पावसाची परिस्थिती कशी राहणार, याबाबत हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे.
पुढच्या काही दिवसांत पावसाची उघडीप पाहायला मिळेल. बुधवारी 24 ऑगस्टपासून राज्यात काहीशी पावसाची उघडीप असेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाव्यतिरिक्त पुढील आठवडाभर म्हणजे सोमवारी 29 ऑगस्टपर्यंत उघडीप असेल.
दरम्यान, सह्याद्रीतील घाट माथ्यावरील नद्या, उगम व धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नद्या व कॅनॉल पात्रातील होत असलेला सततचा होणारा पाणी विसर्ग कायम व नियंत्रणात ठेवण्याचे कार्य सिंचन विभागाला सुरू ठेवावे लागणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील खान्देश ते सोलापूरपर्यंतच्या १० जिल्ह्यात आजपासून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसा व्यतिरिक्त उघडीप असणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
या व्यक्तिरिक्त कोकणातील 4 जिल्ह्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. तिथेही गुरुवारी 25 ऑगस्टपासून पावसाचा प्रभाव किंचित कमी जाणवू शकतो. पण त्यानंतर मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. तर विदर्भात आजपासून पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी असतील. तर शुक्रवार पुन्हा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.