चीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक प्रयोग करत आहे. त्यांच्या लष्करी आणि अंतराळ प्रयोगांनीही जगाला अचंबित केलं आहे. आता चीन कृषी क्षेत्रात नवा प्रयोग करणार आहे. चीन काही काळापासून तीव्र उष्णता आणि दुष्काळाने हैराण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या शरद ऋतूतील तृणधान्य पिकांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. याला तोंड देण्यासाठी चीनने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
61 वर्षात विक्रमी उष्णता
चीनमधील गेल्या 61 वर्षांतील हा सर्वात उष्ण आणि कोरडा उन्हाळा आहे. येथील पिके सुकली असून जलाशयांमध्ये सामान्य पाणी पातळीपेक्षा निम्मेही पाणी देखील शिल्लक राहिलेले नाही. जलविद्युत निर्मितीसाठी लागणारे पाणीही उपलब्ध नसल्याने नैऋत्य चीनमधील अनेक कारखाने आणखी आठवडाभर बंद राहतील, अशी परिस्थिती आहे.
धानासाठी आगामी 10 दिवस महत्त्वाचे
परिसरात तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे घरांमध्ये वाढत्या वातानुकूलित व्यवस्थेच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सिचुआन प्रांताने गेल्या आठवड्यात सर्व कारखाने बंद केले. पण, चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनचे कृषी मंत्री तांग रेनजियान यांनी दक्षिण चीनमधील धान पिकासाठी येणारे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
आपत्कालीन कारवाईची तयारी
अहवालानुसार, तांग म्हणाले की, सरकार शरद ऋतूतील धान्य पिके वाचवण्यासाठी सर्व आपत्कालीन उपाययोजना करेल. चीनच्या एकूण धान्यामध्ये शरद ऋतूतील धान्य पिकांचा वाटा 75 टक्के आहे. तांगच्या मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की अधिकारी ढगांवर रासायनिक फवारणी करून पाऊस वाढवण्याचा प्रयत्न करतील आणि बाष्पीभवन रोखण्यासाठी पिकांमध्ये पाणी धरून ठेवणारी रसायने फवारणी करणार आहे.
जिनपिनसाठी आव्हान
चीन आधीच गंभीर आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिन कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, जिथे ते त्यांच्या तिसर्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरी सर्वांसमोर मांडतील, अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान त्यांची प्रतिमेला धक्का पोहचवू शकते.
संपूर्ण जगावर प्रभाव पडणार
एवढेच नाही तर या हंगामात तृणधान्यांचे उत्पादन कमी झाल्यास त्याचा जागतिक परिणाम होऊ शकतो. त्यांची आयात मागणी झपाट्याने वाढेल. चीन हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. मात्र, देशांतर्गत मागणी खूप जास्त असल्याने तो तांदूळ निर्यात करत नाही. चीनमधील आयातीच्या मागणीमुळे अमेरिका आणि युरोपमध्ये महागाईचा दबाव निर्माण होऊ शकतो. एवढेच नाही तर चीनमधील सौर पॅनेल, प्रोसेसर चिप्स आणि इतर औद्योगिक वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने बंद झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार आहे.
खूप उशीर तर झाला नाही ना?
कारखाने, फ्रॅक्टरी बंद झाल्यानंतरही सरकार यावर फारसे बोलत नाही. अनेक भागातील पिकांचे यापूर्वीच नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले जात नसले तरी कार्यालयीन शॉपिंग मॉल्स आदींची वीज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर-पश्चिम भागात पुराची समस्या गंभीर होत चालली आहे. किंघाईमध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1500 हून अधिक लोक बेघर झाले आहेत. चीनसाठी हा काळ खूप आव्हानात्मक बनला आहे. पण सध्या चीनची दुष्काळाची समस्या अधिक गंभीर आणि दूरगामी दिसत आहे. कृत्रिम पावसासारख्या उपाययोजना चीनला हानीपासून वाचवू शकतील की नाही हे पाहणे बाकी आहे.