किसानच्या मदतीला धावले जवान.. पोलिसांनी केली दोन एकरातील कापूस वेचणी

सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरकावून घेतला असतानाच मजूंराअभावी गडचिरोली जिल्ह्यात कापूस वेचणीही रखडलेली आहे. वाऱ्यामुळे पांढऱ्या सोन्याचे नुकसान अन् शेतकऱ्यांचे हाल हे पोलीसांनी पाहवले नाहीत. त्यामुळे किसानच्या मदतीला जवान धावून आले आणि त्यांनी चक्क 2 एकरातील कापूस वेचणी केली. एवढेच नाही तर कापसाच्या सुरक्षित ठिकाणी साठवणूकीसाठाही मदतही केली. गडचिरोली जिल्ह्यातील रेगुंठा पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी हे चौकटीच्या बाहेर जाऊन केलेल्या कामाचे सोशल मिडियात मोठे कौतुक होत आहे.

यंदा लांबलेल्या पावसामुळे कापूस वेचणी रखडलेली आहे. यातच मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने वेचणीला आलेल्या कापसाची देखील तोडणी शेतकरी करु शकत नाही. यामध्ये वातावरणातील बदलामुळे कापसाचे नुकसान होत आहे. हीच अडचण लक्षात घेऊन हतबल शेतकऱ्याला पोलीसांनी मदतीचा हात दिलेला आहे.

शेती व्यवसयात गटाने काम केले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, आजही गावातील शेतकरी एकवटलेले नाहीत पण याचे महत्व रेगुंठा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अधिकारी यांना कळलेले आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे कापसाचे नुकसान होत आहे. वाऱ्यामुळे पांढरे सोने अस्ताव्यस्त होत असताना शेतकऱ्याचे हाल पाहवले नाहीत म्हणून रेगुंठा पोलीस ठाण्यातील 14 अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर आले आणि एका दिवसामध्ये त्यांनी 2 एकरामध्ये 3 ते 4 क्विंटल कापसाची वेचणी केली आहे.

खरीप हंगामातील कापसाचे पिक आता अंतिम टप्प्यात आहे. नोव्हेंबर अखेरीसच कापूस वेचणी अंतिम टप्प्यात असते. पण यंदा पाऊस लांबल्याने शेती कामे रखडलेली आहेत. यात कापूस वेचणीसाठी मजुर मिळत नाहीत अशी अवस्था झालेली आहे. प्रति 1 किलो कापूस वेचणीसाठी 20 रुपये मजुरी देऊनही मजुर मिळत नाहीत अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे पांढऱ्या सोन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उत्पादनावर अधिकचा खर्च करुनही त्याच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पोलीसांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक हे सोशल मिडियावर हे होतच असते. पण शेतकऱ्याला करण्यात आलेल्या मदतीमुळे किसानच्या मदतीला जवान, जय जवान, जय किसान अशा पध्दतीने नेटकरी व्यक्त झाले आहेत. केवळ कापूस वेचणीच नाही तर वेचलेला कापूस पुन्हा पोत्यामध्ये भरुन सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी पोलीसांनी शेतकऱ्याला मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.