महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम 6 डिसेंबर रोजी दीक्षाभूमीवर होणार आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टिकोनातून गर्दी टाळण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केलंय. पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने कार्यक्रम करावा, असं एका परिपत्रकातून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय.

मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळली. त्यामुळं संसर्गाचा धोका निर्माण झालाय. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण तीव्रतेने पसरते. जास्त गर्दी होणाऱ्या कार्य टाळणे अपरिहार्य आहे. कोविड 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळं ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेला धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे आवश्यक आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांनी दीक्षाभूमी येथे न येता घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षाभूमी येथे शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जे व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षाभूमी येथे अभिवादन करताना येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. तसेच भाविकांचे शरीराचे तापमानही तपासण्यात येईल. ज्यांचे तापमान सामान्य असतील त्यांनाच कार्यक्रमात उपस्थित राहता येतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही.

महापरिनिर्वाण दिनी कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नयेत. कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन नागरिकांनी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.