आज दि.२२ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

निर्मला सीतारामन पवारांच्या बालेकिल्ल्यात, ‘मिशन बारामती’साठी आलेल्या अर्थमंत्री पहिल्याच दिवशी भडकल्या

भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात आहेत. देशभरात मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजप जिकडे दुसऱ्या क्रमांकावर होती, त्या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यावर देण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडे सुप्रिया सुळे खासदार असलेल्या बारामती मतदारसंघाची जबाबदारी आहे.

बारामती मतदारसंघाच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन या पत्रकार परिषदेत संवाद साधत होत्या, पण या पत्रकार परिषदेत वारंवार लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात येत असल्यामुळे सीतारामन भडकल्या. मी पक्ष संघटन मजबूत करायला आले आहे. सतत लोकसभा निवडणुकींवर प्रश्न विचारू नका, असं निर्मला सीतारामन पत्रकारांना म्हणाल्या.

तनुश्री दत्ताचा धक्कादायक खुलासा; म्हणाली ‘अनेकदा मला मारण्याचा प्रयत्न’

अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2020 मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केले. त्यानंतर ती खूपच चर्चेत आली होती.  तनुश्रीला काही जणांनी पाठींबा दिला तर काहींनी तिने नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं. तनुश्रीकडून प्रेरणा घेऊन त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी पुढे येत त्यांचाही अनुभव सांगितलं. त्यावरून  ट्विटरवर MeToo मोहीम सुरू झाली. बराच काळ चर्चेत असलेल्या या मोहिमेची सुरुवात भारतात तनुश्रीच्या आरोपांनी झाली. आता तनुश्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनेक्ट एफएम कॅनडाला मुलाखत देताना तनुश्रीने सांगितले की, तिच्या पाण्यात काहीतरी मिसळून सुद्धा तिला मारण्याचा प्रयत्न झाला आहे.

‘काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले’, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भावना गवळींचं उत्तर

शिवसेनेचा बुधवारी गोरेगावात गटप्रमुखांचा भव्य मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. या भाषणात ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात खासदार भावना गवळी यांच्यावरही टीका केली. भावना गवळी यांनी काही दिवसांपूर्वी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली होती. त्याच गोष्टीवरुन उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला होता. ठाकरेंच्या त्या टीकेवर भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले”, असं भावना गवळी म्हणाल्या आहेत.

आता टाटा समूह बनवणार मेड इन इंडिया आयफोन; Appleचा चीनपेक्षा भारतावर जास्त विश्वास!

जगभरातील दिग्गज टेक कंपन्या आता भारताकडे आकर्षित होत आहे. आयफोन निर्माता कंपनी अॕप्पल देखील याला अपवाद नाही. भारतात स्मार्टफोनची मागणी वाढल्याने आता अ‍ॅप्पल लवकरच भारतात देखील आयफोन बनवणार आहे. यासाठी टाटा ग्रुपने प्रयत्न सुरु केले असून भारतात आयफोन बनवणारी कंपनी विस्त्रो कॉर्पशी (Wistron Corp) टाटा ग्रुपने चर्चा सुरू केली आहे.

आता जोडीने होणार खवय्येगिरी; दामले पुन्हा येतायत ‘आम्ही सारे खवय्ये’ म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला

 झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये कार्यक्रम प्रचंड हिट झाला होता. हा  कार्यक्रम पाहून महाराष्ट्रातील घराघरात गृहिणी अनेक नवनवीन पदार्थ करायला शिकल्या. प्रशांत दामले यांनी अनेक वर्ष या कार्यक्रमाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहचला होता. पण मध्यंतरी हा कार्यक्रम बंद झाला होता. पण आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याचा एक प्रोमो नुकताच झी मराठीने प्रदर्शित केला असून एका नव्या ढंगात हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या नवरात्रात हा कर्यक्रम सुरु होणार आहे. या प्रोमोमध्ये प्रशांत दामले या पर्वाच  वेगळेपण सांगत आहेत. दरवेळी प्रमाणे फक्त पदार्थ बनवायचा नसून यावेळी खास स्पर्धा रंगणार आहे. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी असे या नवीन पर्वाचे नाव आहे. या पर्वाची खासियत म्हणजे इथे सासू सून, आई मुलगा, नवरा बायको पाककृती जोडीने बनवणार आहेत. तसेच कलाकारांच्या जोड्या ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतील.

शिवाजी पार्क मिळालं नाही तर… उद्धव ठाकरे कारवर उभं राहून करणार भाषण!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वाद हा सध्या मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यापाठोपाठ शिंदे गटही कोर्टात गेला आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेवर आक्षेप घेतला आहे. याप्रकरणाची सुनावणी आता उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे.किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण करत आहेत. आतुरता दसरा मेळाव्याची, पुनरावृत्ती होणार, असं कॅप्शन किशोरी पेडणेकर यांनी या फोटोला दिलं आहे. किशोरी पेडणेकर यांच्या या ट्वीटमुळे उद्धव ठाकरे दसरा मेळावा गाडीच्या बोनेटवर घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मशिदीत जियारतीनंतर पहिल्यांदा मदरशात गेले मोहन भागवत

आरएसएस प्रमुख मोहन भागवत गुरुवारी सकाळी दिल्लीच्या केजी मार्गावरील मशिदीत पोहोचले आणि या मुलाखतीदरम्यान भागवतांसोबत गोपाल कृष्ण आणि आरएसएस नेते इंद्रेश कुमारदेखील उपस्थित होते. साधारण 40 मिनिटांपर्यंत भेटीचा कार्यक्रम सुरू होता. दिल्लीतील मशिदीत बैठकीनंतर मोहन भागवत मदरशातदेखील गेले. येथे भागवतांनी आझाद मार्केटमधील मदरशातील मुलांची भेट घेतली.

मुंब्र्यात अग्निवीरच्या भरतीला जाणाऱ्या धुळ्याच्या तरुणाचा दुर्दैवी अंत, रेल्वे स्थानकावर भयानक घटना

मुंब्रा रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक भयानक घटना घडली. एक 20 वर्षीय तरुण धुळे जिल्ह्यातील वडजाई या गावाहून भारतीय सैन्याच्या अग्निवीरच्या भरतीसाठी मुंब्र्याला आला होता. खरंतर त्याच्यासोबत त्याच्या गावातील आणि इतर आजूबाजूच्या गावातील बरोबरीच्या तरुणांचा ग्रुप होता. ते अग्निवीरच्या भरतीसाठी मुंब्राला जाणार होते. पण त्याआधीच रेल्वे स्थानकावर भयानक दुर्घटना घडली. अग्निवीरच्या भरतीसाठी आलेल्या एका तरुणाला लोकलची धडक बसली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने आई-वडिलांचा 20 वर्षांचा मुलगा हिरावला. या मुलाचं नाव रामेश्वर देवरे असं होतं.

कोयना धरण 100 टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा! 

महाराष्ट्रासाठी वरदायिनी ठरणाऱ्या कोयना धरणाने शंभर टीएमसीचा टप्पा पार केला. यामुळे महाराष्ट्रातील उद्योग आणि कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. कोयना धरणात  105.25 टीएमसी इतका पाणीसाठा झाला. धरणाचे सहा वक्री दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणात येणाऱ्या पाण्याची आवक व संपलेली साठवण क्षमता लक्षात घेता धरणाचे सहा वक्री दरवाजे बुधवारी दुपारी 2 वाजता एक फुटाने उचलण्यात आले. यातून 9 हजार 546 क्यूसेक व पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून 1 हजार 50 क्यूसेक असे प्रति सेकंद 10 हजार 596 क्यूसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर्व विभागातील नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दूध-दह्याचे पुन्हा दर वाढणार, ही कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

एकीकडे महागाई वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दरही सणासुदीच्या तोंडावर वाढत आहेत. आधीच दुधाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे दूध आणि दह्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

डेअर प्रोडक्ट विकणाऱ्या मदर डेअरी कंपनीने दुग्ध उत्पादनाच्या किंमती वाढण्याचा विचार केला आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तसे संकेत दिले आहेत.

बंगला वाचवण्यासाठी राणेंची दिल्लीत धाव, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

अधिश बंगला बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने दणका देत बंगल्याबाबत याचिका कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे आता बंगल्यावर पाडकाम करण्यास मुंबई महापालिकेला परवानगी मिळाली आहे. मात्र, नारायण राणे यांनी आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे.

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. नारायण राणे यांच्या बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती. नारायण राणेंनी या नोटीशीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने राणेंची याचिका निकाली काढली आहे. यावेळी कोर्टाने अंतिम निर्णय देत राणेंना झटका दिला.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.