करोनाविरोधातील लढाईत मैदानात
उतरण्याचं डॉक्टरांना आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील डॉक्टरांशी संवाद साधला. त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ अशी संकल्पना मांडत करोनाविरोधातील लढाईत मैदानात उतरण्याचं आवाहन केलं. कोविडची लढाई मोठी आहे भयानक आणि जीवघेणी आहे. या लढाईत लढण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना सोबत येण्यासाठी मी साद घालत आहे. ठाकरेंनी सांगितलं की, “जगातील प्रत्येक घरात एक तज्ज्ञ डॉक्टर असतो. आपल्याही कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असतो. त्याच्याकडे कुटुंबातील प्रत्येकाची माहिती असते,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
चक्रीवादळाचा परिणाम
संपूर्ण महाराष्ट्रभर
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागात जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
रोगराई, घुसखोरी, अतिवृष्टी आपत्तींना
देशाला तोंड द्यावे लागेल : भेंडवळचे संकेत
यंदा पृथ्वीवर नैसर्गिक संकटे येतील. रोगराई, परकीय घुसखोरी, अतिवृष्टीसारख्या आपत्तींना देशाला तोंड द्यावे लागेल. राजकीय परिस्थिती अस्थिर असेल. यावर्षी कमी पर्जन्यमानाचे संकेत आहेत; त्यामुळे पीक परिस्थिती साधारण राहील, तर नैसर्गिक संकटांमध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणात होण्याची भाकिते भेंडवळ घटमांडणीतून वर्तवण्यात आली. ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या घटमांडणीची भविष्यवाणी शनिवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केली.
भेंडवळ घटमांडणी चे मुद्दे
• राजकीय उलथापालथ संभवत नाही. पानसुपारी घटामध्ये कायम होती
• राजाला राजकीय, आर्थिक, नैसर्गिक तसेच परकीय शत्रूंच्या संकटांचा सामना करावा लागेल.
• नैसर्गिक, आर्थिक तथा रोगराईच्या संकटामुळे देशाची तिजोरी खिळखिळी होईल.
कुठेही पळून गेलो नसल्याचं,
पूनावाला यांचे स्पष्टीकरण
सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये आहेत. त्यानंतर आता त्यांचे वडील सायरस पुनावाला हे देखील लंडनमध्ये गेल्याने अफवांना ऊत आला आहे. देश सोडून गेल्याच्या वावड्या उठू लागल्या आहेत. त्यावर सायरस पुनावाला यांनी स्पष्टीकरण देत अफवांचं खंडन केलं आहे. कुठेही पळून गेलो नसल्याचं त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
सोलापूर मध्ये अंत्ययात्रेसाठी
हजारोंच्या संख्यने लोकांची गर्दी
सोलापुरात महाराष्ट्राला करोना लढ्याला धक्का देणारी घटना समोर आली आहे. सोलापुरातील लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांचं नुकतंच निधन झालं. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्यने लोकांनी गर्दी केली होती. राज्यात एकीकडे करोना संकट असल्याने लॉकडाउन लावण्यात आलेला असतानाही लोकांनी तुफान गर्दी केली होती. लोकांच्या गर्दीसमोर पोलीसही हतबल झाल्याचं चित्र होतं.
कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान
खासदार राजीव सातव यांचे निधन
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
उमद्या नेतृत्वाचा
अकाली अस्त : पवार
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, अशी भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
सातव यांचे जाणे हे आमच्यासाठी
अपरिमित नुकसान : राहुल गांधी
मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांचे जाणे हे आमच्यासाठी अपरिमित नुकसान,” अशी भावूक प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली.
“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
एका प्रतिभाशाली नेत्याला
मुकलो : प्रियंका गांधी
काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. राजीव सातव यांच्या रुपाने आम्ही एका प्रतिभाशाली नेत्याला मुकलो आहोत, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे. ”राजीव सातव यांच्या रुपाने आम्ही एका प्रतिभाशाली नेत्याला मुकलो आहोत. ते निर्मळ मनाचे, प्रामाणिक आणि काँग्रेसच्या आदर्शाशी कटिबद्ध असलेले आणि भारतीय जनतेला समर्पित असलेले नेते होते. माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यांची पत्नी आणि मुलांना त्यांच्याशिवाय पुढे जाण्याची शक्ती मिळो,” अशी भावना प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे.
८३५ बीएएमएस वैद्यकिय अधिका-यांना
कार्यमुक्त करण्याचा निर्णय मागे घ्या
८३५ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करता त्यांचा संबंधित ठिकाणी समावेश करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते, मात्र अद्याप याबाबत शासनाने निर्णय घेतलेला नाही. सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ८३५ बीएएमएस वैद्यकिय अधिका-यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे.
पुण्यात भरदिवसा रस्त्यात
कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या
पुण्यात भरदिवसा रस्त्यात कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औद्योगिक वसाहत चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे कंपनीत पाणी पुरवठा करण्याच्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आली. अतुल तानाजी भोसले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज असून यामध्ये निर्घृणपणे हत्या केली जात असल्याचं दिसत आहे.
SD social media
9850 60 3590