काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. राजीव सातव यांच्या रुपाने आम्ही एका प्रतिभाशाली नेत्याला मुकलो आहोत, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्याने गेल्या 23 दिवसांपासून पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या राजीव सातव यांची झुंज आज अखेर संपली. आज पहाटे 5 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सातव यांच्या अचानक जाण्यामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. ”राजीव सातव यांच्या रुपाने आम्ही एका प्रतिभाशाली नेत्याला मुकलो आहोत. ते निर्मळ मनाचे, प्रामाणिक आणि काँग्रेसच्या आदर्शाशी कटिबद्ध असलेले आणि भारतीय जनतेला समर्पित असलेले नेते होते. माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यांची पत्नी आणि मुलांना त्यांच्याशिवाय पुढे जाण्याची शक्ती मिळो,” अशी भावना प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राची मोठी हानी : गडकरी
युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
अभ्यासून नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला : फडणवीस
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.