मनी लॉन्ड्रिंगप्रकणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कोठडी सुनावण्यात आल्याने देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सकाळी जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यता आली आहे.
अॕड. विक्रम चौधरी आणि अॕड. इंद्रपाल सिंग यांनी देशमुख यांच्याबाजूने कोर्टात युक्तिवाद केला. देशमुख यांचं वय झालं आहे. त्यांचा खांदा निखळलेला आहे. त्यामुळे त्यांना एक सहकारी देण्यात यावा. तसेच त्यांना घरचं जेवण देण्यात यावं. त्यांना हायपर टेन्शन आहे आणि त्यांना कोविडची बाधाही झाली होती. त्यामुळे त्यांना कोठडी देऊ नये अशी मागणी या दोन्ही वकिलांनी केली होती. मात्र, देशमुख हे तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांना अनेक नोटीसा पाठवल्यानंतरही ते चौकशीला आले नाहीत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांना कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली.
दरम्यान, 6 नोव्हेंबरनंतर देशमुखांचे वकील हे देशमुखांच्या आजारपणाचं कारण देऊन त्यांना जामिनावर सोडण्याची विनंती करतील. आताही देशमुखांचे वकील जामिनासाठी अर्ज करतील. पण त्यांना जामीन मिळेलच असे नाही, असं ज्येष्ठ वकील उदय वाळूंजकर यांनी सांगितलं.
अनिल देशमुख काल स्वत:हून ईडीकडे हजर झाले. ते काल वकिलांसोबत हजर झाले. रात्री 12.30 वाजेपर्यंत त्यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना अटक केली. मला सहकार्य करायचं आहे. फक्त चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी. जे काही आरोप करण्यात आले आहे, ते केवळ द्वेष भावनेतून करण्यात आले आहे, असं देशमुख यांनी कोर्टाला सांगितलं होतं. कोर्टात याचिका करणं वगैरे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. त्यांना 10 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे, असं देशमुखांच्या वकिलांनी सांगितलं.