दि.१५ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा

विविध हिंदुत्ववादी संघटनांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी लव्ह जिहादविरोधी कायद्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. याबाबत लवकरच कायदा करण्याबाबत निर्णय होईल, असे आश्वासन त्यांनी दिले, असे शिवसेनाच्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.गोगावले म्हणाले, मुख्यमंत्रीबरोबर झालेल्या बैठकीत हिंदू जनजागृती समिती, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू विधिज्ञ परिषद, सनातन संस्था, संकल्प हिंदू राष्ट्र अभियान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, राष्ट्रीय युवा गठबंधन, सर्वभाषिक बाह्मण महासंघ, चित्पावन ब्राह्मण महासंघ आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. बैठकीला ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड, शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. बैठकीमध्ये लव्ह जिहाद तसेच मंदिरांना मदतीच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यात आले. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. कायद्यासंदर्भात राज्य सरकारने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल.

अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी सुट्टी जाहीर करा, शिंदे गटाची मागणी

अखंड हिंदूंचे अराध्य दैवत प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराम मंदीर आणि श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. त्यासाठी देशभरातून लोक अयोध्येला जाणार आहे. लोकभावना लक्षात घेता यादिवशी महाराष्ट्र सरकारने एक दिवसाची सुटी जाहीर करावी, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

सोलापुरात कांद्याची विक्रमी आवक; दर घसरण सुरूच

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लादलेली बंदी, अवकाळी पावसाची भीती आणि कांदा लिलाव एकदिवसाआड बंद होत असल्यामुळे सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत कांद्याची होणारी प्रचंड आवक सुरूच असून शुक्रवारी तब्बल एक लाख ४० हजार क्विंटल एवढा विक्रमी कांदा दाखल झाला. परंतु दर घसरण प्रतिक्विंटल एक हजार ते दीड हजार रूपयांपर्यंत आले आहेत. त्यामुळे प्रचंड आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांना चिंतेने ग्रासले आहे. सोलापूर कृषिउत्पन्न समितीचा परिसर ३०५ एकरपेक्षा जास्त सर्वत्र कांदाच कांदा दिसत आहे. त्याचा फटका सीताफळ,पेरूसारख्या लिलावाला बसून त्यांचेही दर कोसळले आहेत. गेल्या १०-१५ दिवसांपासून सोलापुरात कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजार समितीचे नियोजन कोलमडले आहे.

“…म्हणून लग्नासाठी मुलगी मिळत नाही”, शेतकरी पुत्रांची विधानभवनावर धडक

विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन म्हटले की, सर्वात प्रथम डोळ्यापुढे येतात ते यानिमित्ताने निघणारे मोर्चे. बेरोजगारांना नोकरी हवी असते, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम व्हायचे असते व सेवेत असणाऱ्यांना पगावरवाढ हवी असते, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव हवा असतो. अशा कितीतरी विविध मागण्यांसाठी रोज अनेक मोर्चे विधानभवनावर धडकत असतात. शुक्रवारी शेतकरी पुत्रांनी काढलेल्या मोर्चाची मागणी मात्र आगळीवेगळी होती.शेतमालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी पुत्रांना लग्नासाठी मुली मिळत नाही. त्यामुळे शेतमालाला भाव द्या, या मागणीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांचे लग्नाळू तरुण शुक्रवारी विधानभवनावर धडकले. त्यांच्या हाती असलेले फलक लक्षवेधी होते. “माझ्या शेताला भाव मिळत नाही, म्हणून मला लग्नासाठी मुली मिळत नाही”, “मला शेतीसाठी.. वीज पंपासाठी वीज मिळत नाही… अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळत नाही… तरीही ताठ मानेनं शेती. पण माझ्या शेतमालाला भाव मिळत नाही. पैशा अभावी जगता येत नाही, लग्नाशिवाय मरता येत नाही , काय करू? – एक लग्नाळू शेतकरी ”, असे फलक तरुणांच्या हाती होते. शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल व तरुण मुलांना लग्नासाठी मुलगी देण्यास वधुपिता तयार होईल, हे सांगण्याचा प्रयत्न या मोर्चाव्दारे करण्यात आला.

आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेप्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात २१ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला होता. पण, सर्वोच्च न्यायालायनं राहुल नार्वेकरांना थोडासा दिलासा दिला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी १० जानेवारीची मुदत राहुल नार्वेकरांना न्यायालयानं दिली आहे. यावर शिवसेना ( शिंदे गट ) आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

खासगी बसेसची परराज्यात बेकायदेशीरपणे नोंदणी आणि राज्यात वापर

खासगी बसेसची परराज्यातून बेकायदेशीरपणे नोंदणी करून ती वापरात आणल्याचा एक प्रकार वसई विरार शहरात उघडकीस आला आहे. अशाप्रकारची ३४ बेकायदेशीर वाहने रस्त्यावर धावत असल्याची तक्रार उपप्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भात तक्रार दिली आहे. भंगारात गेलेली वाहने दुरूस्त करून किंवा चोरीच्या इंजिनाच्या आधारे पुनर्निमाण करून आणली जात असण्याची शक्यता आहे. सर्वच शहरात अशी वाहने असून या गुन्ह्याची व्याप्ती राज्यभर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पिकांवरील रोगांचा उपाय आता मोबाईलवर!

शेतकऱ्यांच्या हातातील मोबाईल त्यांना पिकांवरील रोग व किडीवर उपाययोजना सुचविणार आहे. यामुळे तातडीने योग्य ओषधीची फवारणी करुन पिकांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत ‘नॅशनल पेस्ट सर्विलन्स सिस्टीम’ (एन.पी.एस.एस) हे ‘मोबाईल ॲप’ विकसित करण्यात आले आहे. हे ॲप ‘प्ले स्टोअर’मधून आपल्या भ्रमणध्वनीमध्ये घेता येते. याची कार्यपद्धती सोपी आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पिकांचे निरीक्षणे करून कीड व रोगांची प्राथमिक माहिती त्यात नमूद करावी. त्यावर शेतकऱ्यांना तत्काळ उपायोजना सुचविल्या जाऊन कोणते कीटकनाशक वापरावे याची माहिती देण्यात येते. त्यामुळे पिकावर तत्काळ फवारणी करून, होणारे जास्तीचे नुकसान टाळता येणार आहे. लाखो शेतकऱ्यांसाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.

मास्टरमाईंड ललित झा याला सात दिवसांची पोलीस कोठडी

संसदेच्या आवारात आणि लोकसभेच्या सभागृहात धूर पसरवत गोंधळ घालणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसंच हे आरोपी ज्या दाम्पत्याकडे राहिले होते त्यांनाही पोलिसांनी अटक केली. यानंतर या कटाचा मास्टरमाईंड ललित झा हा फरार होता. त्याने पोलिसांसमोर गुरुवारी उशिरा आत्मसमर्पण केलं. त्यानंतर आज ललितला पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने स्वतःच आपण या कटाचा सूत्रधार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच या प्रकरणी आता त्याची कसून चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

धोनीवर फिक्सिंगचे आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला १५ दिवसांची शिक्षा

भारताचा लोकप्रिय क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेनंतर आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना १५ दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालायने हा खळबळजनक निकाल दिला आहे. बार अँड बेंच संकेतस्थळाच्या माहितीनुसार, न्यायमूर्ती एसएस सुंदर आणि न्या. सुंदर मोहन यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावत असताना संपत कुमार यांना शिक्षेविरोधात अपील करण्याची परवानगी दिली असून त्यासाठी ३० दिवसांची मूदत देऊ केली आहे. आयपीएलमधील सट्टेबाजारावर टिप्पणी करत असताना संपत कुमार यांनी धोनीच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यावरून धोनीने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

रोहित शर्मा कर्णधार झाला आणि मुंबई इंडियन्सचं पालटलं नशीब

२००८ मध्ये आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेतल्या बहुचर्चित संघांमध्ये मुंबई इंडियन्सचा समावेश होता. या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होता. सचिनसह सनथ जयसूर्या, हरभजन सिंग, कायरेन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, दिनेश कार्तिक असे असंख्य नावाजलेले खेळाडू या संघात होते. नेतृत्वाची धुरा सचिनसह अनेकांनी सांभाळली पण मुंबई इंडियन्सला जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. २०१३ हंगामाआधी मुंबई इंडियन्सने लिलावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगला ताफ्यात समाविष्ट केलं. पॉन्टिंगचा अनुभव आणि जिंकण्यातलं सातत्य कामी येईल असं मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाला वाटलं होतं. पण तसं झालं नाही. कर्णधार आणि खेळाडू म्हणून लौकिकाला साजेशी कामगिरी होत नसल्याने पॉन्टिंगने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडलं आणि संघातूनही स्वत:ला वगळलं.

‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेचा ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

मराठी मालिकाविश्वात सध्या नवनवीन मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण यामुळे जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. लवकरच झी मराठीवर लोकप्रिय मालिका ‘नवा गडी नवं राज्य’ ऑफ एअर होणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग काही दिवसांपूर्वीचं झालं असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका ऑगस्ट २०२२मध्ये सुरू झाली होती. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. आनंदी, रमा, राघव, सुलक्षणा, वर्षा, रेवा अशी मालिकेतील अनेक पात्र घराघरात पोहोचली. नवनवीन ट्विस्टमुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. पण मध्यंतरी मालिकेच्या वेळा सतत बदलण्यात आल्या. सध्या मालिका दुपारी २ वाजता प्रसारित होत आहे. मात्र आता लवकरच ‘नवा गडी नवं राज्य’ बंद होणार आहे.

गाणं गाताना आला हृदयविकाराचा झटका, स्टेजवरच प्रसिद्ध गायकाचा मृत्यू

अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहेत. याच दरम्यान एका ब्राझिलियन गायकाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. तो स्टेजवर गाणं गात असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्याचं निधन झालं.ब्राझिलियन गॉस्पेल गायक पेड्रो हेनरिक याचे निधन झाले आहे. १३ डिसेंबर रोजी स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स करत असताना त्याचा मृत्यू झाला. गायक अचानक स्टेजवर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. तो अवघ्या ३० वर्षांचा होता. पेड्रो हेनरिकचे चाहते आणि कुटुंबियांना त्याच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसला आहे. तो स्टेजवर कोसळला तेव्हाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.