“…तर पश्चिम बंगालही पाकिस्तानला मिळाला असता” तृणमूलच्या खासदारावर अमित शाह संतापले
“श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी वंग-भंग आंदोलन छेडल्यामुळेच पश्चिम बंगाल भारताला मिळाला, काँग्रेस त्यात पडले असते तर बंगालचा भारतातील उर्वरित भागही तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात गेला असता”, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. लोकसभेत जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२३ ची चर्चा सुरू असताना तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार प्रा. सौगत रॉय यांनी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा विषय काढून ते कधीच स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले नसल्याचे म्हटले. तसेच एकही हिंदुत्ववादी नेता तुरुंगात गेला नाही, असेही सौगत रॉय म्हणाले. यावेळी संतप्त झालेल्या अमित शाह यांनी त्यांचे विधान खोडून काढत थोडक्यात इतिहासाची मांडणी केली.
तुळजाभवानीचे दागिने लाटणारे उघड; महंत, सेवेदारी, अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मौल्यवान दागिने लाटणारे उघड झाले आहेत. जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी याप्रकरणी दोषी असलेले महंत, सेवेदारी आणि मंदिर संस्थानमधील अधिकारी व कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे यातील काही आरोपी मयत आहेत.तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात अनेक मौल्यवान दागदागिने आणि अलंकार आहेत. विविध राजे-महाराजे, संस्थानिक, मुघल बादशाह, निजाम, पोर्तुगीज, डच आदींनी देवीला मोठ्या भक्तीभावाने अर्पण केलेल्या प्राचीन अलंकारांची संख्याही मोठी आहे. भाविकांनी मागील १४ वर्षांत श्रद्धेपोटी देवीचरणी अर्पण केलेले वाहिक सोने २०७ किलो तर अडीच हजार किलो चांदी आहे. शिवकालीन दागिने, वेगवेगळ्या राजदरबारातील नाणी असा समृद्ध खजिना तुळजाभवानी देवीच्या मंदिरात होता. त्यावरच मंदिरातील महंत, मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच काही सेवादार्यांनी डल्ला मारला असल्याचे जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालातून समोर आले आहे.
शिवराज चौहान यांचा रडताना Video व्हायरल; मुख्यमंत्री पद गमावल्याने दुःख झाल्याची चर्चा
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी भाजपने सोमवारी नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव घोषित केले आहे. उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील. आमदार यादव हे चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या शिवराज सिंह चौहान यांची जागा घेतील. मोहन यादव यांनी शिवराज चौहान यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा भूषवले होते. मध्यप्रदेशमधील सत्तेची सूत्र यादव यांच्या हाती जाताच आता शिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. यामध्ये शिवराज सिंह चौहान हे रडताना दिसत आहेत. मुख्यमंत्रीपद गमावल्याच्या दुःखात चौहान यांना अश्रू आवरता आले नाहीत असा दावा या व्हिडीओसह करण्यात आला आहे.
जो बायडेन प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी भारतात येणार नाहीत, क्वाड बैठकही पुढे ढकलली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना २६ जानेवारी रोजी भारतात साजरा केला जाणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. परतुं, बायडेन या कार्यक्रमाला येणार नाहीत, अशी बातमी समोर आली आहे. भारत पुढच्या वर्षी क्वाड देशांच्या शिखर परिषदेचंही आयोजन करणार आहे. ही बैठक जानेवारी महिन्यात होणार होती जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. क्वाड बैठक प्रजासत्ताक दिनाच्या आसपासच आयोजित केली जाणार होती. त्यामुळे जो बायडेन हे प्रजासत्ताक दिन आणि क्वाड बैठक अशा दोन गोष्टींसाठी सलग काही दिवस भारतात येणं अपेक्षित होतं. परंतु, आता अशी माहिती मिळाली आहे की, बायडेन प्रजासत्ताक दिन सोहळ्याला येऊ शकणार नाहीत. तसेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, क्वाड देशांची बैठकदेखील पुढच्या वर्षीच्या अखेरीस आयोजित केली जाऊ शकते.
भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री; छत्तीसगड, मध्य प्रदेश प्रमाणेच भाजपाचे धक्कातंत्र
छत्तीसगड, मध्य प्रदेश प्रमाणेच भाजपाने राजस्थानमध्ये नेतृत्व बदल केला असून भजनलाल शर्मा यांना नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. यामुळे आता वसुंधरा राजे पर्वाचा शेवट झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ३ डिसेंबर रोजी राजस्थान आणि इतर तीन राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला होता. तेव्हापासून मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय होत नव्हता. त्यानंतर पहिल्यांदा छत्तीसगडचा मुख्यमंत्री ठरवला गेला. तेव्हाच भाजपा वर्तमान नेतृत्वात बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे निश्चित झाले.
पाकिस्तानात आत्मघातकी हल्ल्यात २३ जवानांचा मृत्यू, लष्कराकडून दहशतवाद्यांना कंठस्नान
दहशतवादाची जन्मभूमी असलेल्या पाकिस्तानातच दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. डेरा इस्माईल खानच्या दरबान भागात दहशतवाद्यांच्या एका गटाने सुरक्षा दलाच्या चौकीवर हल्ला केल्याने पाकिस्तानी लष्कराचे तेवीस सैनिक मारले गेले आहेत, पाकिस्तान लष्कराच्या मीडिया अफेयर्स विंगच्या अहवालानुसार पाकिस्तानी वृत्तस्थळ डॉनने हे वृत्त दिलं. आज (१२ डिसेंबर) पहाटेच हा आत्मघातकी हल्ला झाला.इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) नुसार, पहाटे सहा दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर हल्ला केला. दहशतवादी पोस्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. परिणामी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन पोस्टमध्ये घुसवले. त्यानंतर आत्मघाती बॉम्ब हल्ला झाला. या बॉम्ब हल्ल्यानंतर इमारत कोसळली. त्यामुळे २३ जवानांचा मृत्यू झाला. दरम्यान काही दहशतवाद्यांना पकडण्यात आल्याची माहितीही पाकिस्तान लष्कराने दिली आहे.
राज्यसभेत ‘इंडिया’ महाआघाडीची कोंडी; द्रमुक खासदाराच्या काश्मीर भूमिकेमुळे गदारोळ
जम्मू आणि काश्मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचा आक्षेपार्ह मुद्दा ‘द्रमुक’चे खासदार महम्मद अब्दुल्ला यांनी सोमवारी राज्यसभेत उपस्थित करून काँग्रेससह ‘इंडिया’च्या घटक पक्षांची कोंडी केली. अखेर अब्दुल्ला यांच्या विधानाशी काँग्रेस सहमत नसल्याचे स्पष्टीकरण खासदार व पक्षाचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांना द्यावे लागले.तमिळनाडूतील ज्येष्ठ समाजसुधारक पेरियार यांचे हे विधान अब्दुल्ला यांनी राज्यसभेत जसेच्या तसे उद्धृत केले. त्याला सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी तसेच, सभापती जगदीश धनखड यांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘अब्दुल्ला यांचे विधान संविधानविरोधी, देशाच्या अखंडतेलाच नव्हे तर, देशाच्या अस्तित्वाला आव्हान देणारे असून अशी आक्षेपार्ह विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’, असे संतप्त मत व्यक्त करत धनखड यांनी अब्दुल्लांचे भाषण तात्काळ थांबवले.
“जुनी पेन्शन लागू न केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांचे कामबंद”, आमदार किरण सरनाईक यांचा इशारा
सरकारने जुनी पेन्शन लागू न केल्यास १४ डिसेंबरपासून सरकारी- निमसरकारी कर्मचारी कामबंद करतील, असा इशारा आमदार किरण सरनाईक यांनी दिला. नागपुरातील विधानभवन परिसरात प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते.
आगामी टी-२० विश्वचषकासाठी इरफान पठाणची इशान किशन ऐवजी ‘या’ खेळाडूला पहिली पसंती
एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष आता टी-२० विश्वचषकाकडे लागले आहे. १९ नोव्हेंबरला फायनल हरल्यानंतर टीम इंडियाने २३ तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-२० सामने खेळले. त्यांनी ही मालिका ४-१ अशी जिंकली. आता दक्षिण आफ्रिकेत भारतीय खेळाडू तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. डरबनमध्ये पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता. आता दुसरा टी-२० सामना मंगळवारी होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने टी-२० विश्वचषकाबाबत मोठे वक्तव्य केले होते.के.एल. राहुल, इशान किशन आणि जितेश शर्मा हे टी-२० विश्वचषकातील यष्टीरक्षकाचे दावेदार आहेत. राहुल याची निवड निश्चित मानली जात आहे. दुसऱ्या स्थानासाठी जितेश शर्मा आणि इशान किशन यांच्यात स्पर्धा आहे. इशानला अनुभव आहे, पण जितेश टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळू शकतो, असा विश्वास इरफान पठाणला आहे. खालच्या फळीत तो उपयुक्त फलंदाज आहे. यामुळे भारताला आक्रमक फलंदाजी करणारा यष्टीरक्षक फलंदाज मिळेल.
दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज! दुसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने होत आहे. डरबनमध्ये खेळलेला पहिला टी-२० पावसामुळे रद्द झाला, त्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. आता दुसरा टी-२० सामना आज गाकेबरहा येथे खेळवला जाणार आहे. टी-२० मालिकेपाठोपाठ वन डे मालिका होणार असून कसोटी मालिकेने या दौऱ्याचा शेवट होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करण्याचे आव्हान युवा भारतीय संघासमोर असेल. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेत चांगला रेकॉर्ड आहे, परंतु सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला येथे विजय मिळवणे सोपे असणार नाही.
ऑनलाईन गेममधून जिंकलेल्या रक्कमेवर किती कर आकारला जातो?
अॅमेझॉन, क्रेड व यासारख्या इतर ई-कॉमर्स वेबसाइट्स बर्याचदा स्पिन-द-व्हील आणि इतर गेमिंग स्पर्धा त्यांच्या ग्राहकांनी खेळण्यासाठी वा खेळविण्यासासाठी विनामूल्य चालविल्या जातात. यात रोख समतुल्य असे आयफोन, वन प्लस मोबाईल, गिफ्ट व्हाउचर आणि इतर गुडीज सारखी तसेच इतरही नॉन-कॅश बक्षिसे दिली जातात. काही वेळा, बक्षिसांऐवजी, कॅशबॅक किंवा उत्पादनांवर खरेदीदारास भरीव सूट दिली जाते. ही बक्षिसे जिंकण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला चक्र फिरवणे किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवर गेम खेळणे आवश्यक असते.ई-कॉमर्स वेबसाइट्सद्वारे चालवल्या जाणार्या ऑनलाइन गेममधून बक्षिसे जिंकणे हा संधीचा खेळ मानला जातो. ३१ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन गेम/स्पर्धा/इतरांकडून जिंकलेल्या बक्षिसात कर आकारणी उद्देशांतर्गत काहीही फरक नव्हता. दोन्ही बक्षिसे कलम ११५ बीबी अंतर्गत एकाच दराने (अधिक अधिभार आणि उपकर) करपात्र होत होते. मात्र आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून यात जिंकलेल्या बक्षिसावर प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम ११५ बीबीजे अंतर्गत कर आकारला जाणार आहे. कलम ११५ बीबीजे नुसार, ऑनलाइन गेममधून जिंकलेल्या स्वरूपातील उत्पन्नावर ३०% सरसकट कर अधिक अधिभार (असल्यास) आणि उपकर आकारला जाईल.
‘ईपीएफओ’ची ईटीएफमध्ये २७ हजार कोटींची गुंतवणूक
निवृत्ती वेतनाचे नियोजन करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ‘पीएफ’च्या पैशाची एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात ‘ईटीएफ’मध्ये विद्यमान आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत २७,१०५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, अशी माहिती सोमवारी संसदेत देण्यात आली. ‘ईपीएफओ’ने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ‘ईटीएफ’मध्ये ५३,०८१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी २०२१-२२ मधील ४३,५६८ कोटी रुपयांपेक्षा अधिक होती, असे केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत सांगितले.
झी मराठी वाहिनीवरील मालिका बंद होण्याचा सपाटा सुरुच
मागील पाच महिन्यांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील कोणती ना कोणती मालिका बंद होताना दिसत आहे. विषय चांगला असला तरी टीआरपीच्या कारणास्तव मालिका ऑफ एअर करण्याचा निर्णय वाहिनीकडून घेण्यात येत आहे. ‘लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ या मालिका टीआरपीच्या कारणास्तव अवघ्या काही महिन्यातच बंद करण्यात आल्या. अजूनही हे मालिका बंद करण्याचा सत्र सुरुच आहे. ‘३६ गुणी जोडी’ जोडीनंतर आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील अनेक मालिकेच्या वेळा बदलण्यात येत आहेत. नवे शो, नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्यामुळे जुन्या मालिकेच्या वेळेत बदल केला जात आहे. ४ डिसेंबरपासून हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘३६ गुणी जोडी’ यांच्या वेळेत बदल करण्यात आला. ‘चला हवा येऊ द्या’ रात्री ८.३० वाजता, ‘नवा गडी नवं राज्य’ दुपारी २ वाजता आणि ‘३६ गुणी जोडी’ दुपारी २.३० वाजता प्रसारित करण्यात निर्णय वाहिनीकडून घेण्यात आला. पण ‘३६ गुणी जोडी’ मालिकेच्या प्रेक्षकांनी वेळ बदलण्याचा निर्णयाचा तीव्र विरोध केला. त्यामुळे वाहिनीने निर्णय मागे घेऊन ‘३६ गुणी जोडी’ मालिका आधीच्या वेळेत म्हणजे रात्री ११ वाजता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.
आणखी एक रेकॉर्ड मोडीत काढत ‘अॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच
रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. या चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन हे ६०० कोटींच्या घरात गेले असून लवकरच ७०० कोटींचा टप्पाही हा चित्रपट पार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.
‘डंकी’ यशस्वी व्हावा म्हणून शाहरुख खानने गुपचुप घेतले वैष्णोदेवीचे दर्शन
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने ‘जवान’ व ‘पठाण’ या दोन्ही चित्रपटांतून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हे वर्षं शाहरुखसाठी फार खास आहे कारण या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांपाठोपाठ किंग खानचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान व राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ या चित्रपटाची गेले काही दिवस चांगलीच चर्चा आहे. चित्रपटातील दोन गाणी अन् एक छोटा टीझर आल्यापासूनच प्रेक्षक याच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते.
काहीच दिवसांपूर्वी याचा ट्रेलर आणि यातील आणखी दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सध्या शाहरुख खान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचंड मेहनत घेत असताना दिसत आहे. ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये शाहरुख खानने वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
SD Social Media
9850603590