पहिल्या दोन सामन्यांतील दमदार कामगिरीमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाचे सोमवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासह मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याचे लक्ष्य आहे.
तुलनेने दुबळय़ा झिम्बाब्वेविरुद्ध केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अपेक्षेनुसार अप्रतिम खेळ केला आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांमध्ये भारताचे वर्चस्व दिसून आले. विशेषत: भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करताना झिम्बाब्वेला अनुक्रमे १८९ आणि १६१ धावांत गारद केले. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावरच होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातही यशस्वी कामगिरी सुरू ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने आता प्रत्येक मालिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी घेतल्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारताला प्रयोगाची संधी आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारणारा भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यास उत्सुक असेल.दुसरीकडे, यजमान झिम्बाब्वेचा कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न असेल. विशेषत: सिकंदर रझा आणि सीन विल्यम्स या अनुभवी खेळाडूंनी योगदान देणे गरजेचे आहे. गोलंदाजीत लूक जोंग्वेवर त्यांची भिस्त आहे.