स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त नवे शैक्षणिक धोरण राबवण्याची तयारी संपूर्ण देशभर करण्यात आली आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता शालेय अभ्यासक्रमात ‘जवानांच्या शौर्यकथां’चा समावेश करण्यात येणार आहे.
करोना संकटामुळे शाळा दोन वर्षे बंद होत्या. त्यामुळे नवे शैक्षणिक धोरण राबवणे सरकारला शक्य झाले नाही. आता पुढील शैक्षणिक वर्षांपासून नवा अभ्यासक्रम राबवला जाणार असल्याचे संकेत आहेत. अभ्यासक्रमात बदल करून त्यांत जवानांच्या शौर्यकथांचा समावेश करण्याचे सूतोवाच नुकतेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सैन्यदलांतील अधिकारीही उपस्थित होते.
‘वीरगाथा’ अधिक व्यापक
२१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत वीरगाथा प्रकल्पांतर्गत स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात आठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना निबंध, कविता, रेखाचित्रे आणि ‘मल्टिमीडिया’ सादरीकरणाच्या माध्यमातून शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावरील प्रेरणादायी कथांचे सादरीकरण करण्यास सांगण्यात आले होते. भविष्यात या स्पर्धेचे स्वरूप अधिक व्यापक होणार असून एक कोटी विद्यार्थी सहभागी व्हावेत, असे नियोजन करण्यात येणार आहे.
त्यासाठी अभ्यासक्रमात सैनिकांच्या शौर्यकथांचा समावेश करण्यात येणार आहे.
आधीपासूनच समावेश
अभ्यासक्रमात आधीपासूनच स्वातंत्र्योत्तर युद्धांतील वीर जवानांच्या शौर्यगाथांचा समावेश असल्याचे शिक्षकांनी सांगितले. परमवीर चक्र, अशोक चक्र यांसह युद्धात असाधारण कामगिरी करणाऱ्या जवानांच्या कथा विद्यार्थ्यांना शिकवून प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात बदल होईलच असे नाही. मात्र त्यात नव्या काही शौर्यकथांचा समावेश केला जाऊ शकतो असे जाणकारांनी सांगितले.
उद्देश काय? विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रति जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमात जवानांच्या शौर्याचे धडे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सशस्त्र दलांशी सल्लामसलत
या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यासाठी सशस्त्र दलांशी सल्लामसलत केली जाणार आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमात जवानांचे धाडसी कार्य आणि सशस्त्र दलांमधील जवानांच्या बलिदान कथांचा समावेश केला जाणार आहे.