देशभरातील व्यापाऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढविली. मे महिन्यासाठी मंथली सेल डिटेल्स सादर करण्याची अंतिम मुदत 11 जून होती, जी आता 15 दिवसांनी वाढवून 26 जून करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. कोविडच्या दुसर्या लाटेचा विचार करता जीएसटी रिटर्न भरण्याच्या अनुपालनासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. जीएसटी परिषदेच्या बैठकीत सर्व राज्यांचे अर्थमंत्री सामील आहेत.
फॉर्म जीएसटीआर -1 (GSTR-1) मध्ये मे 2021 च्या महिन्यात विकल्या गेलेल्या मालाच्या पुरवठ्याच्या तपशिलाची अंतिम तारीख 15 दिवसांनी वाढविण्यात आली. आता शेवटची तारीख 26 जून 2021 करण्यात आलीय.
जीएसटी परिषदेच्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत. 31 जुलै या आर्थिक वर्षात एकत्रित व्यापाऱ्यास वार्षिक परतावा भरण्यासाठी अंतिम तारखेची मुदतवाढ देण्यासही परिषदेने मान्यता दिलीय.
या व्यतिरिक्त, कंपनी अधिनियमांतर्गत नोंदणीकृत करदात्यांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) ऐवजी इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (ईव्हीसी) वापरून जीएसटी रिटर्न भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा वाटतो.