पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुणे मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचा हा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय. मात्र, पंतप्रधान मोदींचा हा दौरा वादाचा ठरण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील काँग्रेस नेत्यांनी मोदींच्या दौऱ्यावेळी निदर्शनं करण्याचा आणि मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनं मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाण्यास सांगितल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी संसदेत केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते अधिक आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, अशी आक्रमक मागणी काँग्रेसकडून करण्यात येतेय.
आता पंतप्रधान मेट्रोच्या उद्घाटनासाठी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहेत. अशावेळी मोदींनी संसदेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागावी आणि मगच महाराष्ट्रात यावं. माफी मागितली नाही तर मोदींच्या दौऱ्यात निरर्शनं करणार आणि काळे झेंडे दाखवणार, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महामेट्रोच्या उदघाटनासाठी पुण्यात येणार आहेत . 6 मार्च रोजी सकाळी 10:30मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा पारपडणार आहे.
पंतप्रधान मेट्रोच्या उद्घाटनासाठी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर जातील. तेथून मेट्रोने ते आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत.
मेट्रोचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची जंगी सभा होणार, आगामी महापालिका निवडणुकीसाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार असून , भाजप कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळणार आहे.
एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावरील सभा आटोपल्यानंतर हेलिकॉप्टरने ते लवळे येथील कार्यक्रमाला जाणार आहेत.
लवळे येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.