केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना. त्यांचा काय संदर्भ देताय?, असा सवालच नारायण राणे यांनी केला.
संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंवर आरोप करण्यात आला आहे. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना विधानभवनाबाहेर नितेश राणे यांनी केलेल्या वर्तनावर प्रश्न विचारण्यात आला. तसेच अजित पवार यांनी आज सभागृहात सदस्यांना समज दिल्याचंही राणेंना सांगण्यात आलं. त्यावर राणे उसळले. माझी मर्यादा काय आहे हे मला माहीत आहे. मी बाकी कोणाची पर्वा करत नाही. कायद्याने वागायचं मला कळतं. माझ्या पदाचा मी दुरुपयोग केला नाही. एवढे वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे. मी अन्याय सहन करणाऱ्यांपैकी नाही. विधान भवनाच्या पायरीवर बोलण्यावर बंधन नाही. तो संसदीय शब्द नाही. कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यांचा काय रेफरन्स देता? असा सवाल राणेंनी केला.
पोलीस एवढे का आले याची माहिती घ्या. एका आमदारासाठी एवढी यंत्रणा लावली आहे. कोकणात काय आतंकवादी आले की पाकिस्तानातून कोणी आलं? साधं एक खरचटलं… मारहाण झाली. मग एवढे पोलीस का? अशा घटना घडत असतात. आमदाराला मारहाण झाली का? की आमदाराने मारहाण केली? नितेश राणेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांचं नाव या प्रकरणात गोवलं जात आहे. निवडणूक संपेपर्यंत त्यांना डांबून ठेवण्याचा डाव आहे. 307 कलम या गुन्ह्यात लावलं आहे. मेंदू, हृदय आणि डोक्याला मार लागला तर हे कलम लावलं जातं. कारण या भागांवर लागलं तर मृत्यू होता. मात्र या प्रकरणात फक्त खरचटलं आहे. तरीही 307 कलम लावलं आहे, असं ते म्हणाले. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दारू पासिंग होते. काय केलं तुम्ही? असा सवालही त्यांनी केला.
मांजराचा आवाज काढल्याने एवढं चिडायला काय झालं? आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा काही संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्याव केलं असेल तर आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे का? ते तसं बोलतात का? असा सवाल त्यांनी केला.
कोकणात काही भागात नाचे आहेत. ते होळीला नाचतात पैसे देऊन. त्या दिवशी तोच प्रकार विधानसभेत झाला. आम्ही त्यांना नाचे म्हणतो. आम्ही नाचे म्हटलं तर तुम्ही म्हणाल मलाच नाचे म्हटलं, असा टोलाही त्यांनी लगावला.
राणे नेहमी समोर येऊन बोलतात. आता नितेश राणे कुठे दिसत नाहीत, असा टोला शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी लगावला होता. प्रभू यांच्या या टोल्याची राणेंनी खरपूस समाचार घेतला. कोण सुनील प्रभू? त्यांची औकात काय? या ना समोर… समोर येऊन बोला. आम्ही समोरच बोलतो. अनिल देशमुख एवढे दिवस कुठे होते? मध्ये नव्हते ना? तो राठोड की फाटोड तोही अदृश्य होता? तुम्हाला इतिहास माहीत नाही. तुम्ही पीए होता. पीएचं काम लिहायचं असतं. बोलायचं नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.