राज्यात आता सुधारित आदेश, सलुन,
ब्युटी पार्लर, जिम सशर्त सुरू राहणार
राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत. नव्या सुधारित आदेशानुसार १० जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने आपल्या सुधारित आदेशात म्हटले, “ब्युटी पार्लरचा देखील हेअर कटिंग सलूनसोबत समावेश केला जात आहे. यानुसार ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. हे काम करणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. याशिवाय ज्या ग्राहकांचे लसीकरण झाले आहे त्यांनाच येथे प्रवेश असेल.”
राज्यात गर्दी कमी करणं हाच
एकमेव रामबाण उपाय : राजेश टोपे
जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राजेश टोपेंना चंद्रकांत पाटलांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आम्ही सगळ्यांनाच विश्वासात घेतो. जर देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या येत असेल तर काळजी करण्याचा विषय आहे. रुग्णालयातील बेड्सची व्याप्ती किंवा ऑक्सिजची मागणी वाढली आहे किंवा गंभीर रुग्ण आहेत असंही नाही. संसर्ग टाळण्यासाठी हे निर्बंध आहेत. जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशात आणि राज्यात गर्दी कमी करणं हाच एकमेव रामबाण उपाय आहे. मुख्यमंत्र्यांनी हा उपाय लागू केला आहे”.
पाकिस्तानी बोटीतून भारतात घुसखोरी
करणाऱ्या दहा जणांना अटक
भारतीय तटरक्षक दलाला मोठे यश मिळाले आहे. तटरक्षक दलाचे जहाज ‘अंकित’ने शनिवारी रात्री अरबी समुद्रात केलेल्या कारवाईदरम्यान ‘यासिन’ या पाकिस्तानी बोटीला अडवले. या बोटीत चालक दलासह १० पाकिस्तानी होते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होती. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी क्रूला पोरबंदरला चौकशीसाठी नेले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयातही करोनाचा
शिरकाव, चार न्यायाधीशांना संसर्ग
देशात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयातही करोनाचा शिरकाव झाला आहे. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीश करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. याआधी गुरुवारी सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायाधीश कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. याशिवाय, रजिस्ट्री विभागातील सुमारे १५० कर्मचारी देखील पॉझिटिव्ह असून क्वारंटाईनमध्ये आहेत. अशा प्रकारे, सीजेआय रमणा यांच्यासह ३२ न्यायाधीशांची क्षमता असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठाचा पॉझिटीव्हीटी रेट १२.५% झाला आहे.
सुल्ली डिल्स अॅप बनवणाऱ्या
ओंकारेश्वर ठाकूरला अटक
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सुल्ली डिल्स अॅप प्रकरणात पहिली अटक केली आहे. हे अॅप बनवणाऱ्या ओंकारेश्वर ठाकूरला दिल्ली पोलिसांनी मध्य प्रदेशमधील इंदोरमधून अटक केली आहे. बुली बाई अॅप प्रकरणातील मास्टरमाइंड असणाऱ्या निरज बिष्णोईला अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीनंतर ओंकारेश्वर ठाकूरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील आयएफएसओ युनिटने ही कारवाई केली.
मुकेश अंबानी यांनी खरेदी
केले न्यूयॉर्कचे लक्झरी हॉटेल
देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शनिवारी ८ जानेवारी रोजी न्यूयॉर्कचे प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल मँडारीन ओरिएंटल ९.८१ कोटी डॉलरमध्ये विकत घेण्याची घोषणा केली. भारतीय चलनात या हॉटेलची किंमत सुमारे ७२८ कोटी रुपये आहे.
मांढरदेवची काळेश्वरी
देवीची यात्रा रद्द
करोनाचा वाढता प्रादुर्भाव व यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता तिसऱ्या लाटेतील करोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने वाई तालुक्यातील काळेश्वरी देवी (मांढरदेव) व दावजी बुवा (सुरुर) या यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दि १० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत जमा बंदी आदेश लागू केले आहेत. तालुक्यातील मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची आणि सुरुर येथील धावजी बुवाची वार्षिक यात्रा येत्या दि १६ ते १८ जानेवारी रोजी आहे
ज्येष्ठ चित्रकार भालचंद्र शिवराम ऊर्फ
बाळ ठाकूर यांचे वृद्धापकाळाने निधन
मराठी पुस्तके आणि नियतकालिकांच्या मुखपृष्ठ रेखाटनांचे सुमारे सहा दशके काम करून स्वत:ची वेगळी शैली निर्माण केलेले ज्येष्ठ चित्रकार भालचंद्र शिवराम ऊर्फ बाळ ठाकूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आहेत. ठाकूर यांचा जन्म २४ एप्रिल १९३० रोजी लांजा तालुक्यातील भांबेड येथे झाला. मुंबईच्या सर जे.जे स्कूल ऑफ आर्टमधून १९४८ मध्ये त्यांनी पदविका प्राप्त केली. ‘जे. वॉल्टर थॉम्प्सन’, ‘अय्यर्स’, ‘उल्का’ अशा जाहिरात संस्थांत त्यांनी काही काळ नोकरी केली. १९५० नंतर ठाकूर मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे, मांडणी आणि संकल्पनांचे काम करू लागले.
केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत
महाराष्ट्राच्या भावना यादवचे यश
केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मुंबईच्या भावना यादव हीने मोठे यश संपादन केले आहे. ती या परीक्षेत देशातून चौदावी आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येते. भावनाचे वडील देखील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. भावना ही सहाय्यक फौजदार सुभाष यादव यांची कन्या आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे चार जानेवारी रोजी केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये भावना ही देशातून चौदावी आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून
स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय
वातावरणात झालेला बदल, धुके आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून काही स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दाट धुक्यांमुळे दृष्यमानता कमी झाल्याने अनेकदा ट्रेनला नियोजित स्थळी पोहोचण्यास उशीर होतो. तसेच देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेविभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून आता काही स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
SD social media
9850 60 35 90