पवारांनी खडसावलं, ठाकरेंनी सुनावलं, सावरकर मुद्द्यावरून राहुल गांधी बॅकफूटवर!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यासमोरच या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच रविवारी झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून राहुल गांधींना सुनावलं होतं. राहुल गांधींच्या वक्तव्याला विरोध म्हणून विरोधकांच्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणताही नेता सहभागी झाला नव्हता.
आता संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे. शिवसेनेचा मुद्दा समजून घेत आता काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात सावरकरांचं नाव घेणार नाही, यावर एकमत झालं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कर्जदारांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, बँकांना मोठा धक्का
सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, कर्जदाराचे बँक खाते फ्रॉड घोषित करण्यापूर्वी त्याची बाजू ऐकून घेतली पाहिजे. तसेच अशी कारवाई केल्यास तर्कशुद्ध आदेशाचे पालन करावे, असेही सांगितले. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सोमवारी तेलंगणा उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी दिलेला निर्णय कायम ठेवला.
ही खाती फसवणूक म्हणून घोषित केल्याने कर्जदारांच्या जीवनावरही विपरीत परिणाम होतो, असे खंडपीठाने म्हटले आहे. फसवणूक मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची खाती फसवणूक म्हणून वर्गीकृत करण्यापूर्वी बँकेने त्यांना बोलण्याची संधी दिली पाहिजे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर हा निर्णय घेण्यात आला आहे. खंडपीठाने सांगितले की ‘ऑडी अल्टरम पार्टम’ हा नियम मनमानीपणापासून वाचवण्यासाठी आरबीआय निर्देशातील तरतुदींमध्ये वाचला पाहिजे. या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला सुनावणीशिवाय दोषी घोषित केले जाणार नाही. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी.
शिंदे सरकारचा नवा निर्णय, रुग्णांवर उपचारासाठी घेणार मांत्रिकांची मदत, पैसेही देणार
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मांत्रिक म्हणजे भूमकाकडे जाऊन मेळघाटातील आदिवासी बांधव आपला आणि लहान बालकांचा अनेकदा उपचार करीत असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर आल्या आहे. त्यात अनेकांचा मृत्यू देखील झाला.लहान मुलांपासून मोठी मंडळीदेखील आजारपणात रुग्णालयात जाण्याऐवजी मांत्रिकाकडे धाव घेतात. परिणामी आजार कमी होण्यापेक्षा बळावतो. त्यामुळे वाढणारी अंधश्रद्धा पाहता मेळघाटात जिल्हा रुग्णालय अधिकाऱ्यांनी अनोखा उपक्रम समोर आला आहे.आदिवासी बांधवांचा मांत्रिकावर जास्त विश्वास आहे. मात्र, आदिवासी बांधवांनी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावा, यासाठी आता मांत्रिकच (भूमका) प्रशासनाला मदत करणार आहे. त्यासाठी प्रशासन मांत्रिकाच्या दारी पोहोचलं आहे.मांत्रिकांनी रुग्णांना रुग्णालयात रेफर करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि यासाठी प्रति रुग्ण 100 रुपये मानधन मिळावे, अशी ऑफर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासाठी धारणी, चिखलदरा तालुक्यात दोन दिवसाचे प्रशिक्षण होणार आहे. मेळघाटात दोन तालुके आहेत. त्यात 300 ते 315 गावे असून त्यांची अडीच ते पावणे तीन लाख लोकसंख्या आहेत.
कसब्यातल्या भूकंपाचे भाजपमध्ये पडसाद, चंद्रकांत पाटलांच्या विधानावर टिळकांची नाराजी!
कसबा पेठच्या बालेकिल्ल्यात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. पोटनिवडणुकीतल्या या भूकंपाच्या धक्क्याचे पडसाद आता भाजपमध्ये उमटायला सुरूवात झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर मुक्ता टिळक यांचे पूत्र आणि भाजपचे पदाधिकारी कुणाल टिळक यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.टिळक कुटुंबाचा मतदारांशी संपर्क तुटल्यानं कुणाल आणि शैलेश टिळकांना उमेदवारी नाकारल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानं वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यावर मुक्ता टिळक यांचे पूत्र कुणाल टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुक्ता टिळक यांच्या पुण्यातील कामाला दुर्लक्षित करणं बरोबर नसल्याचं कुणाल टिळक यांनी म्हटलंय. गेल्या 50 वर्षांत टिळक कुटुंबानं पुण्यात जे काम केलं ते मतदार 2 महिन्यात कसं विसरणार, असा सवालही त्यांनी केलाय. येत्या निवडणुकीत होणारे बदल दिसतील, असं सूचक वक्तव्यही कुणाल टिळक यांनी केलंय.
मंत्रालयाच्या दारावर दुर्दैवी घटना, विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
राज्याच्या गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयासमोर धक्कादायक घटना घडली आहे. मंत्रालयासमोर दोन महिलांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी एका महिलेनं विषप्राशन केलं होतं. या महिलेचा उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.मंत्रालयासमोर सोमवारी धुळे आणि मुंबईतून आलेल्या दोन महिलांनी आंदोलन केलं होतं. शितल गादेकर आणि संगिता डवरे अशी आंदोलन करणाऱ्या महिलांची नाव आहे. शितल गादेकर यांनी मंत्रलायात प्रवेश दरम्यान विष प्राशन केलं होतं.विष प्राशन करत करत असताना पोलिसांनी त्यांना रोखलं आणि ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आज सकाळी शितल गादेकर यांच्या वरती जेजे रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. संगीता डवरे यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
लाईट गेले म्हणून धमकी, फडणवीसांच्या घरात बॉम्ब असल्याचा फोन!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या घरात बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन करण्यात आला होता. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा हा फोन केला. या धमकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या घरी लगेचच बॉम्ब शोधक पथक दाखल झालं. तसंच पोलिसांनी त्यांच्या घराची सुरक्षाही वाढवली.
पोलीस तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार घरातले लाईट गेल्यामुळे या व्यक्तीने फडणवीसांच्या घरी बॉम्ब ठेवल्याचा फोन केला होता. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
गँगस्टर अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा
उमेश पाल अपहरण प्रकरणी अतिक अहमद दोषी आढळल्यानंतर त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिक अहमदसोबतच त्याचा निकटवर्तीय शौकत हनीफ, दिनेश पासीसह आणखी एकाला जिल्हा न्यायालयाच्या एमपी एमएलए विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. तर अतिकचा भाऊ अशरफला निर्दोष ठरवण्यात आलं होतं.
अतिक अहमद याच्यावर 1979 मध्ये खुनाच्या आरोपाखाली पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 1989 रोजी अतिकवर त्याच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माफिया चांद बाबाची हत्या केल्याचा आरोप होता. 1996 मध्ये प्रयागराज येथील व्यापारी अशोक साहू यांची हत्या केल्याचा आरोपही अतिकवर होता, ज्याने त्याचा भाऊ अशरफच्या गाडीला ओव्हरटेक केले होते.
सुषमा अंधारेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य आमदार शिरसाट यांना भोवणार?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये सुषमा अंधारे यांच्याबद्दल स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दाचा वापर करणाऱ्या आमदार शिरसाट यांच्यावर कलम 354 (अ), 509 500 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी यांनी केली आहे. हा तक्रार अर्ज क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाकडे दिला आहे. आता पोलीस याबाबत तपास करून पुढील कारवाई करणार आहेत.
उद्धव ठाकरे हाजीर हो, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनाही दिल्ली कोर्टाचा समन्स
शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरूच आहे. अशातच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मानहानीच्या दाव्याबाबत दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे. या याचिकेवर सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत.शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. प्रत्येक सभेत आणि पत्रकार परिषदांमध्ये बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून उल्लेख केला जात आहे.त्यामुळे राहुल शेवाळे यांनी दिल्ली कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. ठाकरे गटाकडून वारंवार शिवसेनेच्या आमदारांचा ‘गद्दार, पन्नास खोके एकदम ओके’ अशी वक्तव्य वापरून बदनामी केली जात असल्याची तक्रार या याचिकेतून करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 एप्रिलला होणार आहे. या सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी आदित्य ठाकरेंसह आणि संजय राऊतांना समन्स बजावला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये उद्धव ठाकरेंना कोर्टात हजर राहावं लागणार आहे.
संभाजीराजेंनी केली पोलखोल, आरोग्य मंत्र्यांवर गंभीर आरोप करत केला Video Viral
माजी खासदार संभाजीराजे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील विकासकामांची झडती घेतली आहे. संभाजीराजे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची पाहणी केली. यावेळी तेथील अवस्था पाहून संभाजीराजेंनी संतापव्यक्त केला आहे. त्यांनी थेट तानाजी सावंत यांच्या राजानाम्याची मागणी केली आहे.
संभाजीराजे म्हणाले की, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरीदेखील परिस्थिती जैसे थे आहे ! इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अशा संवेदनाहीन व मग्रूर मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा स्वराज्य यामध्ये उतरेल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
वडील गेल्यानंतर 16 दिवसांनी आईचाही मृत्यू; आई कुठे काय करतेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर
आई कुठे काय करते ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. दर्जेदार कथानक असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, यश, अभि, अनघा, आशुतोष, आप्पा -कांचन ही पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. प्रत्येक घरात अशी माणसं आपल्याला भेटतात. त्यामुळे ही सगळी पात्र प्रेक्षकांना आपली वाटतात. मालिका यशाच्या शिखरावर येण्यात या कलाकारांइतका किंवा त्याहून अधिकचा वाटा हा मालिकेच्या संपूर्ण टीमचा आहे. मालिकेच्या लेखिकेचा आहे. नमिका वर्तक या मालिकेचं लेखन करतात. प्रेक्षकांना दररोज पाहायला मिळणारे एपिसोड नमिता वर्तक या लिहीतात. पण मालिकेच्या लेखिका सध्या फार वाईट परिस्थितीतून जात आहे. एकावेळी मायेचं छत्र हिरावल्यानं त्या मोठ्या दु:खाचा सामना करत आहे.
मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. ते नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट लिहिल त्यांच्या मनातील भावना मांडत असतात. यावेळी त्यांनी मालिकेच्या लेखिका नमिता वर्तक यांच्या आयुष्यातील वाईट घटना सांगितली. नमिता वर्तक यांच्या वडिलांचं 15 दिवसांआधी निधन झालं. त्यानंतर लगेच 16 दिवसांनी त्यांच्या आईला देखील देवाज्ञा झाली. नमिता वर्तक म्हणजे ज्येष्ठ प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांची कन्या. कमलाकर नाडकर्णी अनेक महिने आजारी होते. त्यांची सुश्रृषा करण्यासाठी नमिता अनेक दिवस दवाखान्यात होत्या. दवाखान्यात बसून त्यांनी आई कुठे काय करतेचे एपिसोड लिहिले आहेत, असं मिलिंद गवळी यांनी सांगितलं.
SD Social Media
9850 60 3590