महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे 16 जुलैला दहावीचा निकाल काल जाहीर झाला. सकाळी विभागनिहाय पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना वेबसाइटवर निकाल पाहता येणार होता. पण संकेतस्थळावर तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या.
त्यामुळे निकाल पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागले. याची दखल घेत राज्य मंडळामार्फत दहावीचा निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटीसंदर्भात शासनाने चौकशी समिती गठीत केली आहे.
निकालापुर्वी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधितांसोबत बैठक आयोजित केली होती का? निकाल घोषित करण्यासंदर्भात मंडळातील संबंधित तांत्रिक सल्लागारांना पुर्वसूचना दिली होती का? संकेतस्थळाची देखभाल करण्याऱ्या कंपनीला निकाल घोषित करण्याबाबत पुर्वसूचना दिली होती का? दहावीला प्रविष्ठ असलेल्या मुलांची संख्या मोठी असल्यामुळे निकाल घोषित करण्याच्या अनुषंगाने संकेतस्थळाची पुर्व तपासणी केली होती का? निकालासाठी क्षमतेच्या सर्व्हरचा वापर केला होता का? याबाबत समिती सखोल चौकशी करणार आहे. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना समितीमार्फत होणाऱ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. समितीने तपासणी अहवाल 15 दिवसांत शासनाला सादर करावा, असे आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.