अमेरिका आणि इराणमध्ये 2015 चा अण्वस्त्र करार पुन्हा लागू करण्याबाबात चर्चा सुरु आहे. बराक ओबामा यांच्या कारकीर्दीतील हा करार दोन्ही देशांनी मान्य केला तर इराणवरील अनेक आर्थिक निर्बंध कमी होतील. मात्र, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्याहू यांनी या कराराला विरोध केलाय. इराणकडून इस्राईलला असलेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी अमेरिकेशी संघर्ष करायची वेळ आली तर तेही करु, असं सूचक विधान बेंजामिन यांनी केलंय. ते इस्राईलची गुप्तचर संस्था मोसादच्या नव्या प्रमुख डेविड बार्निया यांच्या स्वागत समारंभात बोलत होते.
बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, “इराणमधील अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी इस्त्राईल अमेरिकेसोबत संबंध खराब होण्याचा धोकाही पत्करेल. अण्वस्त्र सज्ज इराण इस्राईलसाठी सर्वात मोठा धोका आहे. इस्त्राईल यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. मला आशा आहे की असं काही होणार नाही, पण जर इस्राईलला आपलं मित्र राष्ट्र अमेरिकेसोबत संघर्ष करणे किंवा इस्राईलच्या अस्तित्वाला धोका असणाऱ्याचा खात्मा यापैकी एक निवडण्याची वेळ आली तर इस्राईल दुसरा पर्याय निवडेल. इस्राईल अमेरिका-इराणमधील करार रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. अमेरिका आणि इतर देश 2015 करार पुन्हा देण्यात यशस्वी झाले तरी इस्राईलचा विरोध कायम राहिल.”
नेतन्याहू यांनी हे वक्तव्य अशावेळी दिलंय जेव्हा इराणसह जगातील 6 शक्तीशाली देश करारावर चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे जो बायडन यांनी आपल्या निवडणूक प्रचारात जाहीरपणे इराणसोबतचा अण्वस्त्र करार पुन्हा बहाल करण्याचं आश्वासन दिलं होतं. बराक ओबामा यांच्यानंतर अमेरिकेच्या सत्तास्थानी आलेल्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हा अण्वस्त्र करार एकतर्फी असल्याचा आरोप करत रद्द केला होता. तसेच इराणवर अनेक आर्थिक निर्बंध लादले होते.
नव्याने इराण आणि अमेरिकेत याच करारावरुन चर्चा सुरु आहे. यानुसार अमेरिका इराणवरील आर्थिक निर्बंध हटवेल. त्याबदल्यात इराण आपल्या अण्वस्त्र निर्मितीवर प्रतिबंध लावेल. नेतन्याहू यांनी या कराराचा जोरदार विरोध केलाय. यावेळी त्यांनी अमेरिकेकडे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी पुरेसी संसाधनं नसल्याचा दावा नेतन्याहू यांनी केलाय.