आज दि.१ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

24 तासात 10 इंच पावसाने गुजरातमध्ये हाहाकार; पूरसदृश परिस्थिती

जुनागडमध्ये 24 तासात 10 इंच पाऊस झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले असून, शेतांचेही मोठं नुकसान झालं आहे.जुनागडमध्ये मुसळधार पावसामुळे ओजट नदीचा किनारा वाहून गेला आहे. बामणसाजवळील नदीच्या बंधाऱ्याला तडे गेले आहेत. नदीचे पाणी शेतात शिरल्याने भुईमुगाचे नुकसान झाले.जुनागडचे हसनापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गिरनारमध्ये मुसळधार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे सखल भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुनागडमधील 3 धरणे पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झाली आहेत.गुजरातमधील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी पावसाने सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

बुलढाण्यातील अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख; मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. आज पहाटे १ ते २ च्या दरम्यान महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स बस ही नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. तेव्हा सिंदखेडराजा पिंपळखुटा परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ जणांचा जीव वाचला आहे.या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची, तर जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हळहळला आहे. या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणीही केली. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदतही जाहीर केली आहे. मात्र या अपघातावरुन आणि समृद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांवरुन शरद पवारांनी शिंदे फडणवीस सरकारचे कान टोचले आहेत.

पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

अखेर रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच काही मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल देखील होणार असल्याची माहिती समोर येत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं विलंब झाल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. पुढील आठवडयात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

कोकण, गोव्यात अतिवृष्टी तर, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकला सावधानतेचा इशारा

महाराष्ट्र व केरळच्या किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढग तयार झाल्यामुळे कोकण तसेच गोवा याठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाटाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात येत्या ४८ तास संततधार राहील.मान्सूनने जवळजवळ ९९ टक्के देश व्यापला आहे. मागील आठवड्यापासून मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. अंदमान, निकोबार, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हिमालय, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, कच्छ, सौराष्ट्र, कोकण, गोवा तसेच राज्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होत आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर येताच इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.आशा नाडकर्णी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब 1957 ला मुंबई मध्ये रहावयास आले आणि तेव्हा पासून त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्या उत्तम नर्तिका देखील होत्या. 1957 ते 1973 ह्या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपट केले.नवरंग (1959), गुरु और चेला (1973), चिराग (1969), फरिश्ता (1968), श्रीमानजी (1968), दिल और मोहब्बत (1968), अलबेला मस्ताना (1967), बेगुनाह (1970) अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

बुट-चप्पल खरेदी करताय? 1 जुलैपासून नविन नियम होणार लागू

आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग म्हणजे चप्पल आणि शूज. पावसाळ्यात तर चिखलामुळे आणि पाण्यामुळे खराब होऊन चप्पल तुटण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतात यापुढे निकृष्ट दर्जाच्या फूटवेयरची विक्री होणार नाही. 1 जुलै 2023 पासून भारतात निकृष्ट दर्जाच्या फूटवेयर निर्मितीवर आणि विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. सरकारने फूटवेयर युनिट्सना जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियमांचे पालन करून क्वालिटी कंट्रोल ऑर्डर(QCO) लागू करण्याचे आदेश दिले आहेत.सरकारच्या या आदेशानंतर देशात निकृष्ट दर्जाच्या फूटवेयरचे उत्पादन आणि विक्री दोन्ही बंद होणार आहे. यासाठी सरकारने फुटवेअर कंपन्यांना सूचना दिलेल्या आहेत. सरकारने फूटवेयर कंपन्यांसाठी स्टँडर्ड लागू केली आहेत. ज्याचे पालन करून त्यांना आता शूज आणि चप्पल बनवावी लागणार आहे. 27 फुटवेअर प्रोडक्ट्सचा QCO च्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे. उर्वरित 27 प्रोडक्ट्सलाही पुढील वर्षी या कक्षेत आणलं जाईल.

फ्रान्समध्ये नागरिकांकडून सलग तिसऱ्या दिवशी जाळपोळ, दगडफेक सुरूच

एका किशोरवयीन मुलाच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. सलग तीन दिवस फ्रान्सची राजधानी पॅरीस धगघगतंय. देशाच्या विविध भागांमधून जाळपोळ आणि दगडफेकीच्या बातम्या समोर येत आहेत. प्रामुख्याने पोलिसांवर हल्ले होत आहेत. पोलिसांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ले झाल्याची प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत. देशात आतापर्यंत शेकडो गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे.दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून हिंसाचाराच्या तिसऱ्या दिवसअखेर तब्बल ४०० जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २०० हून अधिक पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

विदर्भ ट्रॅव्हल्सनंतर आणखी एक भीषण अपघात, 50 लोकांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून अनेक भयानक अपघाताच्या घटना समोर येत आहे. एका पेक्षा एक हादरवणारे अपघात होत आहेत. आता केनियातही भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय. पश्चिम केनियामध्ये शुक्रवारी ट्रकचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.ट्रकचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. ट्रकने इतर वाहने आणि पादचाऱ्यांनाही धडक दिली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लोंडियानी जंक्शन येथे हा अपघात झाला. रस्त्यावर अनेक मिनीबस आणि उलटलेल्या ट्रकचे भयानक दृश्य समोर येत आहेत. रिफ्ट व्हॅलीचे प्रादेशिक पोलिस कमांडर टॉम मोबोया ओडेरो यांनी सांगितले की, केरिचोच्या दिशेने निघालेल्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि आठ वाहने, अनेक मोटारसायकल, रस्त्याच्या कडेला असलेले विक्रेते आणि इतर व्यवसायातील लोकांना धडक दिली.

अमेरिकेतील विद्यापीठांत वंशआधारित प्रवेशांना मनाई

अमेरिकेतील विद्यापीठांत प्रवेशाची प्रक्रिया राबविताना यापुढे वंशाच्या आधारे प्रवेश देता येणार नाही, असा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. देशात सकारात्मक भेदाच्या नावाखाली राबविले जाणारे हे अनेक दशकांचे धोरण त्यामुळे संपुष्टात येणार आहे. येथील शिक्षण क्षेत्र त्यामुळे ढवळून निघाले आहे.विभिन्न वंचित गटांना शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने १९६० मध्ये हे धोरण अवलंबिण्यात आले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेला निर्णय मान्य नसल्याची भूमिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मांडली आहे. अमेरिकेतील भेदभाव अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आम्ही मान्य करू शकणार नाही, असे ते म्हणाले.

युक्रेन प्रश्नासह द्विपक्षीय सहकार्यावर मोदी-पुतिन चर्चा, ४ जुलै रोजी शांघाय सहकार्य संघटनेची परिषद

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरध्वनीवरून संवाद साधला. यात उभय देशांची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली, तसेच युक्रेन पेचावरही विचारविनिमय झाला, असे रशिया सरकारतर्फे सांगण्यात आले.येत्या ४ जुलै रोजी शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) आभासी शिखर परिषद होणार असून त्याचे यजमानपद भारताकडे आहे. त्याआधी पुतिन आणि मोदी यांच्यात ही चर्चा झाली.क्रेमलिनतर्फे सांगण्यात आले की, ही चर्चा सकारात्मक आणि अर्थपूर्ण ठरली. द्विपक्षीय धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच उभय बाजूने संपर्क वाढविण्यावर चर्चेत भर देण्यात आला. युक्रेनसभोवतालच्या प्रदेशांतील स्थितीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. विशेष लष्करी क्षेत्रातील सद्यस्थितीची माहिती पुतिन यांनी मोदी यांना दिली. हा पेच राजनैतिक आणि राजकीय चर्चेतून सोडविण्यास युक्रेनने साफ नकार दिला आहे, असे त्यांनी मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले, असे क्रेमलिनच्या निवेदनात म्हटले आहे.

समान नागरी विधेयक पावसाळी अधिवेशनात? केंद्रात हालचालींना वेग

समान नागरी कायद्यासाठी केंद्रातील हालचालींना वेग आला असून, १३ जुलैपर्यंत वाट पाहा, असे सूचक विधान कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी केले. उत्तराखंडमधील भाजप सरकार या कायद्याबाबतचे विधेयक विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडणार असून, केंद्रातील सरकारही संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवडय़ात किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडण्याची शक्यता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच समान नागरी कायद्याचे स्पष्ट शब्दांमध्ये समर्थन केले. त्याआधी केंद्रीय विधि मंत्रालयाच्या सूचनेनुसार विधि आयोगाने १४ जून रोजी निवेदन प्रसिद्ध करून जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. १३ जुलै ही हरकती सादर करण्याची अंतिम तारीख असून, त्यानंतर नव्या शिफारशींच्या आधारे केंद्रातील समान नागरी कायद्याचा मसुदा तयार केला जाणार आहे. संसदेच्या विधि व आस्थापना विषयक स्थायी समितीने ३ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत विधि आयोगाला मत मांडण्यासाठी बोलावले आहे. केंद्रातील या घडामोडींमुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये समान नागरी कायद्यासंदर्भातील विधेयक दोन्ही सदनांमध्ये मांडले जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक सखोल चर्चेसाठी स्थायी समितीकडे पाठवले जाऊ शकते.

भारतीय फुटबॉलचा जादुगार सुनील छेत्री निवृत्त होणार?

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा जगातील सर्वोत्तम स्ट्रायकर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९२ गोल केले आहेत. टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यासाठी तो सॅफ चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून आता त्याला लेबनॉनविरुद्ध खेळायचे आहे. टीम इंडियाने नुकताच लेबनॉनला हरवून इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकला. सुनील छेत्रीने उपांत्य फेरीपूर्वी निवृत्तीबद्दल सांगितले.सुनील छेत्रीने शुक्रवारी (३० जून) आपल्या निवृत्तीबद्दलच्या चर्चांना स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. त्याने सांगितले की खेळ सोडण्याची कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. छेत्री ३८ वर्षांचा आहे परंतु तरीही तो भारतीय आक्रमणाचा प्रमुख आहे. सध्या सुरू असलेल्या सॅफ चॅम्पियनशिपमध्ये त्याने तीन सामन्यांमध्ये केलेले पाच गोल हा त्याचा पुरावा आहे.

भुवनेश्वर कुमारने जिंकली चाहत्यांची मने, ‘या’ कामासाठी दिली १० लाख रुपयांची देणगी

टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार बराच काळ संघातून बाहेर आहे.. मात्र, तो आयपीएल २०२३ च्या हंगामात खेळताना दिसला होता. यंदाच्या हंगामात तो सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. मात्र, त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली नाही.आता भुवनेश्वर कुमार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. या वेगवान गोलंदाजाने गुरुकुल आश्रमाला १० लाख रुपये देणगी म्हणून दिले आहेत. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसून, मीडिया रिपोर्ट्समध्ये हे दावे केले जात आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गुरुकुल आश्रमाला १० लाख रुपये देणगी दिली आहे. वास्तविक, त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिले आहेत. पण भारतीय संघाच्या गोलंदाजाने मुलांच्या शिक्षणासाठी गुरुकुल आश्रमाला १० लाख रुपये देणगी म्हणून दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.