आज दि.२ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ढवळाढवळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे त्रिपक्षीय सरकारचे भाजपचे स्वप्न अखेर आज साकार झाले आहे. भाजपविरोधात असलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दणका देण्यासाठी भाजपने हे दोन्ही पक्ष फोडून खिळखिळे केले.भाजपबरोबर सत्तेत असूनही ठाकरे यांनी सातत्याने तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहांवर सातत्याने टीका केली होती. भाजपबरोबर सत्तेत येण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची २०१८ मध्ये तयारी होती, पण पवार यांनी शिवसेनेला बरोबर ठेवण्यास विरोध केला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी ‘ लोकसत्ता लोकसंवाद ‘ उपक्रमात गेल्या वर्षी केला होता. पण शिवसेनेबरोबरची युती हिंदुत्वाची असल्याने त्यांना सत्तेतून न वगळण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला होता. शरद पवार यांनी २०१४ मध्येही भाजप सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.

राष्ट्रवादीच्या तीन आमदारांची ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका

राष्ट्रवादीतील राजकीय भूकंपानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील मात्र, या घडामोडीवर भाष्य करण्यास उपलब्ध होऊ शकले नाहीत.

अजितदादांचा आता थेट घड्याळावर दावा, सांगितलं बहुमताचं गणित

राष्ट्रवादीला मोठा खिंडार पडलं आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते भाजप, शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिपदाची शपथ घेताच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत मोठा दावा केल आहे. विधानसभा, लोकसभा निवडणूक ही राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ याच चिन्हावर लढवणार आहोत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्ष पहायला मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पवारांची पुन्हा गुगली, शपथविधीआधी आमदारांनी केला फोन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांचाही समावेश असल्याने पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली आहे. पत्रकार परिषद घेत पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.शरद पवार म्हणाले, एकदा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं, ते राष्ट्रवादीबद्दल सुद्धा होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे. त्यांनी राज्य सरकारचा उल्लेख केला. त्यामुळे जलसंपदा खात्यात ती तक्रार होती, त्याचा उल्लेख केला. भ्रष्टाचाराचा आरोप केला, आज मला आनंद राष्ट्रवादीच्या काही आमदारांना शपथ दिली. त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हतं, या आरोपांमधून पक्षाला आणि त्या आमदारांना मुक्त केलं,. त्याबद्दल पंतप्रधान मोदींचा आभारी आहे, अशी गुगली शरद पवार यांनी टाकली आहे.

दिल्लीतील बैठकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शिंदे-भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांसह नऊ आमदार मंत्री झाल्याचा जबरदस्त राजकीय धक्का महाविकास आघाडीला बसला असला तरी, दिल्लीत जूनमध्ये झालेल्या चार बैठकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीला खतपाणी घातल्याचे आता स्पष्ट झाले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ‘६ अ कृष्ण मेनन’ मार्गावरील निवासस्थानी रात्री साडेदहा वाजता भेट घेतली होती. दोन तास झालेल्या बैठकीनंतर शिंदे व फडणवीस तातडीने मुंबईला परतले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ३० जून रोजी, शुक्रवारी रात्री शिंदे व फडणवीस यांनी पुन्हा शहांची भेट घेतली होती. या दोन्ही बैठकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. रविवारी अचानक अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे शुक्रवारी शिंदे व फडणवीसांनी तातडीने केलेला दिल्लीदौऱ्याचे इंगित उघड झाले.

फ्रान्स अजूनही धगधगतंय, १३०० हून अधिक जणांना अटक

काही दिवसांपासून फ्रान्समध्ये हिंसाचार सुरू आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर पॅरिसमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिस आणि सरकारविरोधात फ्रान्समधील नागरिक आक्रमक झाले आहेत. पाचव्या दिवशीही मार्सेल या शहरात पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला.पॅरिसच्या उपनगरात मंगळवारी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी १७ वर्षीय नाहेल एम. नावाच्या मुलावर गोळीबार केला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सरकार आणि पोलिसांच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उफाळला.शनिवारी फ्रान्समध्ये सुमारे ४५ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी ९०० आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी १३०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.

जीएसटी संकलन १.६१ लाख कोटींवर

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन जूनमध्ये १२ टक्के वाढून १.६१ लाख कोटींवर पोहोचले. गेल्या वर्षी जूनमध्ये ‘जीएसटी’तून १.४४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. जीएसटी संकलनाने १.६० लाख कोटींचा टप्पा ओलांडण्याची गेल्या सहा वर्षांतील ही चौथी वेळ आहे.  सहा वर्षांपूर्वी म्हणजे १ जुलै २०१७ रोजी अप्रत्यक्ष कर प्रणाली लागू झाल्यानंतर आतापर्यंत जीएसटी संकलनाने चौथ्यांदा १.६० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. 

संसदेचे अधिवेशन २० जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैला सुरू होऊन ११ ऑगस्टपर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी दिली.  ही घोषणा करताना जोशी यांनी राजकीय पक्षांना या अधिवेशनादरम्यान फलदायी चर्चेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करण्याचे विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरू असल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचा जोरदार पुरस्कार केला असून, या मुद्यावर केंद्रात वेगाने हालचाली सुरू असतानाच हे अधिवेशन होत आहे.

ब्राझीलमध्ये बोल्सोनारोंवर आठ वर्षे निवडणूक बंदी

ब्राझीलचे माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना २०३० पर्यंत निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली. ब्राझीलच्या सर्वोच्च निवडणूक न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना २०२२ च्या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर, सार्वजनिक माध्यमांचा गैरवापर तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीबाबत निराधार संशय निर्माण केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. आता आठ वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. 

आदिवासींमध्येही समान नागरी कायद्याविरोधात सूर

समान नागरी कायदा लागू करण्याच्या प्रस्तावावर सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे मत जाणून घेण्याबाबतच्या २२व्या विधि आयोगाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, अनेक अल्पसंख्याक समुदायांनी या संहितेला विरोध केला असून त्यांना विविध आदिवासी भागांतूनही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्तेही समान नागरी कायद्याबाबत साशंकता व्यक्त करीत आहेत.  विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, मुलांचा ताबा, पोटगी, बहुपत्नीत्व आणि बहुपतीत्व इत्यादी व्यक्तिगत बाबींमध्ये सर्व धर्मियांसाठी देशभर एकच समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रस्ताव आहे. २०११च्या जनगणनेनुसार देशात ८.६ टक्के लोकसंख्या असलेल्या अनुसूचित जमातींच्या (एसटी)  विशिष्ट प्रथा-परंपरा आहेत. काही राज्यांमध्ये त्यांचे परंपरागत कायदेही संहिताबद्ध करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी समान नागरी कायदा लागू करणे अवघड असल्याचे मत व्यक्त होत आहे.   

राज्यातील विधानसभा व लोकसभेची एकत्र निवडणूक?

राज्यामध्ये वारंवार होणाऱ्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याने लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्र घेण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता दुणावली आहे.वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसैनिक आणि लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरे गटाला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी इतिहासाची पुनरावृत्ती होऊन शरद पवार यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय महाविकास आघाडीमध्ये आता काॕँग्रेस अधिक मजबूत होईल. उलट, शिंदे गटाच्या बळावर मुंबई महापालिकेची निवडणूकही भाजपला जिंकता येत नसल्याने महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील घटक पक्ष करत आहेत.

देश उंदरांनी हैराण; घेतला संपूर्ण उंदीर संपवायचा निर्णय

प्रत्येकाच्या घरात उंदीर शिरत असतो. मात्र एक संपूर्ण देशाच उंदरांनी हैराण झालाय.या देशात उंदरांची संख्या इतकी वाढली आहे की तिथल्या इतर प्राण्यांचे भवितव्य धोक्यात आलंय.या देशाचं नाव न्यूझीलंड आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, उंदरांमुळे या देशातील राष्ट्रीय पक्ष्याचे अस्तित्वही धोक्यात आलं आहे.उंदरांच्या प्रजाती पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्णय या सरकारने जाहीर केले आहे.देशाची अस्मिता असलेल्या किवी पक्ष्यांना वाचवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत 2050 पर्यंत देशाला पूर्णपणे उंदीरमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.सरकारच्या या टार्गेटवर अनेक तज्ज्ञ शंका उपस्थित करत आहेत. लाखो चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या क्षेत्रातून उंदरांचा नायनाट करणं अशक्य असल्यातं त्यांचं मत आहे.

अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादी आक्रमक, जयंत पाटलांनी केली मोठी घोषणा

राज्यातील राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते पदावर काम करत होते. अजित पवार यांनी आज शपथ घेतली. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकतीने शरद पवार यांच्या सोबत आहे. पक्षाच्या मान्यतेशिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथ घेतली आहे. विधी मंडळ मधील सदस्य शरद पवार यांच्या सोबत आहे. बऱ्याच सद्यास्यानी शरद पवार यांच्याशी भेटून आम्ही गोंधळलो असल्याचे कबुल केले. आजच्या कृतीला शरद पवार यांचा पाठिंबा नाही. बुधवारी 5 जुलैला दुपारी 1 वाजता यशवंत चव्हाण सेंटरला बोलावले आहे. पक्षांचे सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. सत्तेत असतानासुद्धा काही पक्षाने विरोधी पक्षाला फोडले असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते पदी निवड केल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली.

आठवड्याची सुरुवातच कोसळधार होणार; पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट

आज रविवार त्यामुळे पावसामुळे तसा अनेकांना फारसा फरक पडला नसेल, पण सोमवारपासून मात्र चांगलीच तारांबळ उडणार आहे.पुढील 4-5 दिवस मुसळधार आणि अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. इथं येलो अलर्ट आहे.तर मराठवाड्यात हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. इथंही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

‘भेळ हवीये भेळ ????, आमच्या महाराष्ट्रात.. ‘ महाराष्ट्रातील सत्ता नाट्यावर तेजस्विनी पंडितचं ट्वीट चर्चेत

अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ज्यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यां आमदारांचा समावेश आहे. या प्रकरणावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रितिक्रिया येत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं या प्रकरणाला धरून एक ट्वीट केलं आहे. तिचं हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आलं आहे.तेजस्विनी पंडितनं ट्वीट करत म्हटलं आहे की, “भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!” असं ट्वीट करत तेजस्विनीने त्याला Maharashtrapolitics असा हॅशटॅग दिला आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरीही कमेंट्स करत आहेत. लोकशाही फक्त नावापूरतीच, बाकी सालटं काढायचं काम सुरूच राहील, असं एका युजरने म्हटलंय.

बेन स्टोक्सने षटकारांच्या हॅट्ट्रिकसह झळकावले वादळी शतक

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात अॕशेस मालिकेतील दुसरा सामना लॉर्डस मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातील पाचव्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने वादळी खेळी करत शतक झळकावले. स्टोकच्या कसोटी कारकिर्दीतील हे १३ वे तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दुसरे कसोटी शतक आहे. बेन स्टोक्सने षटकारांची हॅट्ट्रिक लगावत आपले शतक पूर्ण केले. या खेळीच्या जोरावर त्याने एक खास कारनामा केला आहे. त्याने षटकार मारुन शतक पूर्ण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शरद पोंक्षेंनी मांडले परखड मत; पोस्ट शेअर करत म्हणाले, “शब्द आज वारले”

प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शरद पोंक्षेंनी शेअर केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.राष्ट्रवादीचा मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनासह अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यामुळे राज्यातील या सत्तानाट्यावर प्रतिक्रिया देत शरद पोंक्षे लिहितात, “तत्व, वैचारिक बैठक, नितीमत्ता हे शब्द आज वारले.”

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.