ऑक्टोबर महिना उजाडला तरी राज्यातील पावसाला परतीचा मुहूर्त सापडेना. अजूनही राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटनाही घडत आहे. अशातच आता शहापूर तालुक्यातील एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यात वीज पडल्याने एका महिलेनं आपला जीव गमवावा लागला आहे.
पाऊस सुरू असताना किंवा वीजा कडाकत असताना झाडाखाली न थांबण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. मात्र, पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अनेकदा लोक झाडाखाली जाऊन थांबतात. शहापूर तालुक्यातील जांभे या गावातील मंदा तुकाराम वेखंडे यांनीही तेच केलं. मात्र, आपली ही चूक त्यांच्या जीवावर बेतली.
जांभे येथील महिलेच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंदा तुकाराम वेखंडे असं महिलेचं नाव आहे. त्या 45 वर्षांच्या होत्या. मंदा वेखंडे या शेतावर काम करत असताना अचानक विजेसह पावसाला सुरूवात झाली. यावेळी त्यांनी धावत जात बाजूलाच असलेल्या एका झाडाचा आधार घेतला. मात्र, त्या झाडाखाली येऊन थांबल्या त्याच क्षणी त्यांच्या अंगावर वीज पडली.
या घटनेनंतर महिलेला उपचारासाठी शहापूर आसनगाव येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. महिलेचा वीज पडून मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते रवी लकडे यांनी केली आहे.
बीडमध्येही मुलीचा मृत्यू –
वडवणी तालुक्यातील देवळा ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सत्तेवाडी या ठिकाणी सोमवारी सायंकाळी एक मुलीचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला होता. शाळकरी मुलीचा सीताफळ तोडताना अंगावर वीज पडून झाल्याचं सांगितलं जात आहे. सीमा धर्मराज पवार असं मृत मुलीचं नाव आहे.