महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानांच्या निषेधार्थ ऐन एकादशीच्या दिवशी पंढरपुरात बंद पुकारल्याने पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोठे हाल झाले. या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिल्याने दुकाने, हॉटेलपासून सर्व काही बंद होते.
सध्या प्रत्येक गावा-शहरात वेगवेगळय़ा तारखांना बंद पाळला जात आहे. मात्र या बंदची माहिती बाहेरून येणाऱ्यांना नसल्याने यां आंदोलनांमुळे त्यांची मोठी गैरसोय होते. पंढरीत देखील काल महिन्याच्या एकादशीच्या दिवशीच बंद पुकारल्याने पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोठे हाल झाले. येथील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी हा बंद पुकारला होता. सोमवारी सकाळी येथील महात्मा फुले पुतळा येथून मोर्चा काढण्यात आला. बंदमुळे शहरातील व्यवहार मोठय़ा प्रमाणात ठप्प होते. दरम्यान, कालच महिन्याची एकादशी तसेच लागून सुटी आल्याने पंढरीत मोठय़ा प्रमाणात भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. त्यांना या बंदचा मोठा फटका बसला. शहरातील सर्व छोटी मोठी दुकाने सकाळपासून बंद होती. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिसून येत होती. बंद पुकारल्याने लहान, वयोवृद्ध भाविकांचे हाल झाले.