आज दि.२८ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मोदी सरकारकडून मोठा दिलासा! Diabetes, BP, Cancer Medicine स्वस्त

औषधांच्या किमती ठरवणारी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने १०९ व्या बैठक झाली. या बैठकीत 74 औषधांच्या रिटेल किमती निर्धारित करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने 74 औषधांच्या किमती निर्धारित केल्यानंतर या औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत, म्हणजे ही औषधं आता स्वस्त झाली आहेत.स्वस्त झालेल्या औषधांच्या यादीत ब्लड प्रेशर, डायबेटिज, कॅन्सरवरील औषधांचाही समावेश आहे. त्यामुळे या रुग्णांसाठी मोदी सरकारने दिलेला हा मोठा दिलासा आहे.डायबेटिजचं औषध डेपाग्लीफ्लोजन आणि मेटाफॉर्मिनची एक टॅबलेट 27.75 रुपयांना मिळणार आहे. अॕस्ट्राझेनका कंपनीचं ही एक टॅबलेट सध्या 33 रुपयांना मिळते.कॅन्सर रुग्णांच्या उपचारात केमोथेरेपीवेळी वापरलं जाणारं इंजेक्शेन फिलग्रास्टिनची किंमत  1034.51 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. या इंजेक्शनची किंमत कंपनीनुसार वेगवेगळी आहे. पण ती दोन हजारांच्या वरच आहे. म्हणजे आता ही किंमत निम्मी झाली.ब्लड प्रेशरवरील एल्मिसार्टन आणि बिसोप्रोलोलची एक टॅबलेट 10.92 रुपये झाली आहे. ज्याची किंमत आतापर्यंत 14 रुपये होती.

आठवलेंनी विजयी उमेदवाराचं नावच सांगून टाकलं

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचाच विजय होईल अशी मला खात्री असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचाच उमेदवार निवडून येईल. ज्या ठिकाणी नियमभंग झाल्याच्या तक्रारी आहेत तिथे कारवाई केली जाईल असं आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच कसबा पोटनिवडणुकीत भाजपने पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत होता, या आरोपांना देखील रामदास आठवले यांनी सडतोड उत्तर दिलं आहे. पैसे वाटणं ही आमची संस्कृती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संसदभवनातील शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला, शिंदे गटाकडून आणखी एक धक्का

निवडणूक आयोगानं धनुष्यणबाण  चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर शिंदे गटात उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या अडचणी मात्र आणखी वाढल्याचं पहायला मिळतय. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याचे फोटो देखील हटविण्यात आले आहेत. संसद भवनातील तिसऱ्या मजल्यावर शिवसेनेचं हे कार्यालय आहे.

मेस्सीने रोनाल्डोच्या विक्रमाशी केली बरोबरी, दुसऱ्यांदा पटकावला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब

आज फिफा अवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली असून यात जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला आहे. या पुरस्कारासह मेस्सीने ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोलंडचा रॉबर्ट लेवांडोस्की यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

अर्जेंटिनाच्या संघाने 2022 मध्ये मेस्सीच्या नेतृत्वाखाली कतार येथे आयोजित फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. याविजयासह त्याने तब्बल 36 वर्षानंतर फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तेव्हा आज फिफा अवॉर्ड्सच्या घोषणे दरम्यान मेस्सीला पॅरिसमध्ये 2022 सालचा फिफा प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मेस्सीने दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवला असून 2019 मध्ये त्याला या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोलंडचा रॉबर्ट लेवांडोस्की यांनी दोनदा फिफा चा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.

तिसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिल घेणार के एल राहुलची जागा?

उद्यापासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली होती. बुधवार पासून इंदोर येथील होळकर स्टेडियमवर हा सामना रंगणार असून याकरता भारतीय संघ इंदोर येथे पोहोचला आहे. याचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले असून ते पाहून शुभमन गिल हा के एल राहुल याला तिसऱ्या कसोटी सामन्यात रिप्लेस करू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारताचा सलामी फलंदाज के एल राहुल सध्या चांगल्या फॉर्मात नाही. मागील काही सामन्यांमध्ये तो संघासाठी चांगली कामगिरी करू शकला नव्हता. तेव्हा त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यात प्लेयिंग 11 बाहेर बसवण्याची मागणी काही जणांकडून करण्यात येत आहे. अशातच बीसीसीआयने आज इंदोर येथील क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघ  सराव करीत असल्याचे फोटो शेअर केला आहे. ज्यात  कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मासोबत शुभमन गिल नेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे.  यावरुन अनेकजण के एल राहुल याच्या ऐवजी शुभमन गिल याला संधी मिळणार असेल बोलत आहेत.

बालकांचं शोषण करणाऱ्या ३० हजार जणांना अमेरिकेतील संस्थेनं शोधलं, मध्य प्रदेशातून ४ हजार जणांना होणार अटक

देशात दिवसेंदिवस बाल लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान, अमेरिकेतील एका संस्थेनं बाल लैंगिक अत्याचाराबाबतची मध्य प्रदेशातील धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे.

यूएसमधील ‘नॅशनल सेंटर फॉर मिसींग अँड एक्स्प्लॉयडेट चिल्ड्रेन’ (NCMEC) या संस्थेनं बाल लैंगिक अत्याचार संबंधित साहित्य, चित्रफित व्हायरल करणाऱ्या मध्य प्रदेशातील ३० हजारांहून अधिक जणांना शोधून काढलं आहे. यामध्ये लहान मुलांचं पॉर्नोग्राफिक साहित्य व्हायरल करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.NCMEC या सस्थेचा अहवाल समोर आल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याची योजना आखली आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या तपशीलाच्या आधारे मध्य प्रदेशातील चार हजाराहून अधिक घटना कारवाईयोग्य असल्याचं समोर आलं आहे. तर इतर २६ हजार प्रकरणांची छाननी सुरू आहे. 

सावधान! ‘लिंक’वर ‘क्लिक’ करताच ३ लाख लंपास, केवायसीसह पॅनकार्ड जोडणीच्या नावावर सायबर गुन्हेगार सक्रिय

सायबर लुटारू आता नागरिकांची फसवणूक करण्‍यासाठी वेगवेगळ्या क्‍लृप्‍त्‍या वापरत असून अशाच एका प्रकरणात येथील व्‍यक्‍तीने ३ लाख रुपये अवघ्‍या काही सेकंदात गमावले. सायबर लुटारूने पाठविलेल्‍या ‘लिंक’वर ‘क्लिक’ क‍रताच या व्‍यक्‍तीच्‍या बँक खात्‍यातून २ लाख ९९ हजार ९९७ रुपये परस्‍पर अन्‍य खात्‍यात वळते झाले.

श्रीकृष्‍णपेठ येथील अजय बिहारीलाल अग्रवाल (५९) यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्‍या विरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.एका अज्ञात आरोपीने अग्रवाल यांना कॉल करून आपण एचडीएफसी बँकेतून बोलत असल्‍याचे सांगितले. बँक खात्‍याला पॅनकार्ड जोडण्‍याची आणि केवायसी करण्‍याची आजची शेवटची तारीख असून तसे न केल्‍यास आपल्‍याला बँकेचे व्‍यवहार करण्‍यास अडचण निर्माण होईल, अशी भीती आरोपीने दाखवली. केवायसी आणि पॅनकार्डची संलग्‍नता ही प्रक्रिया अत्‍यंत सोपी असून त्‍यासाठी केवळ बँकेने पाठवलेल्‍या लिंकवर आपल्‍याला क्लिक करावे लागेल, अशी सूचना भामट्याने अग्रवाल यांना केली. पलिकडून अग्रवाल यांच्‍या मोबाईलवर एक लिंक पाठवण्‍यात आली. त्‍या लिंकवर क्लिक करताक्षणी त्‍यांच्‍या खात्‍यातून २.९९ लाख रुपये डेबिट झाल्‍याचा संदेश त्‍यांच्‍या मोबाईलवर धडकला.

शिवसेनेच्या 56 पैकी 55 आमदारांना व्हीप, एकालाच सुरक्षा कवच का?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुंबईत सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेने 55 आमदारांना व्हीप बजावला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला, यानंतर शिवसेनेचं विधिमंडळातलं कार्यालयही एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेला देण्यात आलं.

दरम्यान शिवसेनेच्या 55 आमदारांना व्हीप बजावण्याच्या निर्णयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. शिंदे गटाने ठाकरे गटातल्या आमदारांना व्हीप बजावला जाणार नाही, असं सुप्रीम कोर्टात सांगितलं, तरीही त्यांनी व्हीप बजावला, असा आक्षेप ठाकरे गटाने घेतला आहे. ठाकरे गटाच्या या आक्षेपावर शिवसेना मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूरकरांच्या श्रद्धास्थानाला 100 वर्ष पूर्ण, 31 हजार दिव्यांनी उजळणार मंदिर!

तमाम नागपूरकरांचे  श्रद्धास्थान असलेल्या श्री पोद्दारेश्वर राम मंदिराच्या स्थापनेला येत्या 4 मार्च रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने श्री पोद्दारेश्वर राम मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 1 मार्च आणि 4 मार्च रोजी मंदिर परिसर 31 हजार दिव्यांनी उजळून निघणार आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.