मुंबई, रत्नागिरी, रायगड, अलिबाग, सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे आणि राज्यभरात मोठ्यासंख्येने शिष्य, अनुयायी असलेल्या नवनीत्यानंद महाराज(मोडक महाराज) यांचे काल सकाळी पुणे-सातारा महामार्गावर भीषण कार अपघातामध्ये निधन झाले.
त्यांचे वाहन दुभाजकाला धडकल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तर वाहन चालक अत्यवस्थ असून त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत.
‘कल्याण पश्चिम सदगुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट चे संस्थापक व अध्यक्ष गुरुवर्य पुज्य सदगुरु श्री नवनीत्यानंद मोडक महाराज यांचे प्रवासादरम्यान कोल्हापूर येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.’ अशा शब्दांमध्ये भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महाराजांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कल्याण येथील श्री स्वामी समर्थ मठात ठेवले जाणार आहे. ही बातमी समजताच राज्यभरातील भक्तगण कल्याणच्या दिशेने रवाना झाले आहेत.