बँकॉक येथून कोलकात्याकडे येणाऱ्या थाई स्माईल एअरवेजच्या विमानात प्रवाशांमध्ये झालेल्या हाणामारीची नागरी हवाई वाहतूक कार्यालयाने (बीसीएएस) पोलिसांत तक्रार दिली आहे. नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही प्रवाशांची ही वागणूक स्वीकारार्ह नसल्याचे सांगत घटनेवर टीका केली आहे.
गेल्या आठवडय़ात घडलेल्या या घटनेचे दृश्य समाजमाध्यमांमध्ये पसरल्यानंतर बीसीएएसने कारवाई सुरू केली आहे. विमान कंपनीने डीजीसीएला या घटनेचा अहवाल दिला असून मागे केलेले आसन पुढे घेण्यास एका प्रवाशाने नकार दिल्यामुळे वादाला सुरूवात झाली आणि त्याचे पर्यावसन मारामारीत झाल्याचे त्यात म्हटले आहे.