राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सीबीआय आपलं काम करत आहेत. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टात येईल. तेव्हा काय करायचं ते पाहू, असं संजय राऊत म्हणाले.
अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं राऊत म्हणाले. सीबीआय त्यांचं काम करत आहे. कोर्टाने आपलं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारही आपलं काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली. ज्या दिल्लीत राष्ट्रपतींचं निवासस्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार हाकतात. त्या ठिकाणी गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजन विना रुग्णांचा प्राण जातो. कोरोनामुळे अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात आरोग्य विषयक अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता हा नरक नाही तर काय आहे? असा सवाल त्यांनी केला. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.