सूर्यकुमारला वर्षांतील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन

भारताचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) २०२२ वर्षांतील सर्वोत्तम पुरुष ट्वेन्टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्याला या पुरस्कारासाठी इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन, पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान आणि झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझाचे आव्हान असेल.

मुंबईकर सूर्यकुमारने २०२२ वर्षांत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने तब्बल १८७.४३च्या धावगतीने ११६४ धावा फटकावल्या. या वर्षांत सर्वाधिक धावा सूर्यकुमारच्या नावेच आहेत. त्याने दोन शतके आणि नऊ अर्धशतकांची नोंद केली. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षांत १००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो केवळ दुसराच फलंदाज ठरला. तसेच त्याने वर्षभरात ६८ षटकार मारले आणि हासुद्धा विक्रम ठरला.

ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात सूर्यकुमारने सहा डावांत तीन अर्धशतके झळकावली. त्याने ५९.७५च्या सरासरीने आणि १८९.६८च्या धावगतीने २३९ धावा केल्या. या स्पर्धेनंतर त्याने न्यूझीलंडमध्ये शतक झळकावण्याची किमयाही साधली. सूर्यकुमार सध्या ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी असून त्याचे ८९० गुण आहेत. त्याच्यात आणि दुसऱ्या स्थानावरील रिझवानमध्ये ५४ गुणांचा फरक आहे.

सूर्यकुमारसह करन, रिझवान आणि रझा यांना वर्षांतील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. करन ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तसेच रिझवानने वर्षभरात २५ सामन्यांत ९९६ धावा केल्या. त्यामुळे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानी राहिला. तसेच झिम्बाब्वेच्या रझाने ट्वेन्टी-२० विश्वचषकात चमक दाखवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.