आज दि.२२ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

“आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, पण…”

अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून ते मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली आहे. आज ( २२ जुलै ) खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे.“अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावरच मी सांगितलं होतं की, ते लवकरच मुख्यमंत्री बनतील. हे सांगणारा मी पहिला व्यक्ती होतो. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.याबद्दल रावसाहेब दानवे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. त्यावर रावसाहेब दानवे म्हणाले, “आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. यात कोणताही बदल होणार नाही. पण, निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती पाहून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेते चर्चा करत निर्णय घेतील.”

“इर्शाळवाडी दुर्घटना, ते धारावी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला पंतप्रधानांसह झालेल्या चर्चेचा तपशील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पूर्ण कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अचानक ही भेट का झाली असेल? यावर चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच माध्यमांना ही सदिच्छा भेट होती असं सांगितलं. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या चर्चेचा तपशीलही स्पष्ट केला.महाराष्ट्रात जे प्रकल्प सुरु आहेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. तसंच इर्शाळगडच्या घटनेचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून चौकशी केली. एवढंच नाही तर सर्वतोपरी मदतीचं आश्वासनही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारावीच्या प्रकल्पाची आवर्जून आठवण काढली. धारावी हा आशिया खंडातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोकाचं जीवनमान उंचावेल असंही मोदी म्हणाले तसंच हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

मंदिर उत्सवांचा उपयोग शक्तीप्रदर्शनासाठी करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारलं

मद्रास उच्च न्यायालयाने मंदिरांच्या उत्सावांचा उपयोग शक्तीप्रदर्शनासाठी करणाऱ्यांना चांगलंच फटकारलं. शुक्रवारी (२२ जुलै) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सध्या अनेक मंदिरांच्या उत्सवांचा उपयोग वेगवेगळे गटांच्या शक्तीप्रदर्शनासाठी होत असल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच अशा उत्सवांच्या आयोजनांमध्ये कोठेही भक्ती दिसत नाही, असंही नमूद केलं.न्यायालय म्हणाले, “मंदिरांचा उद्देश भाविकांना शांतता आणि आनंदासाठी देवाची भक्ती करणे हा आहे. मात्र, दुर्दैवाने मंदिर उत्सवात हिंसाचार होत आहे. हे उत्सव त्या भागात कोण अधिक शक्तीशाली आहे हे दाखवण्याचा मंच झाले आहेत. हे उत्सव आयोजन करण्यात कोठेही भक्ती दिसत नाही. यामुळे मंदिर उत्सवांच्या मूळ हेतूचाच पराभव होत आहे.”

पश्चिम बंगालमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत मारहाण

मागील दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर मणिपूर हिंसाचाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जमावाने दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले. ही घटना ताजी असताना आता पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात दोन आदिवासी महिलांना कथितपणे नग्न करून मारहाण करण्यात आली आहे.या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना १९ जुलै रोजी मालदा जिल्ह्यातील बामनगोला येथील आठवडी बाजारात घडली. 

कोरियन ओपनमध्‍ये सात्विक-चिराग जोडीचा बोलबाला!

सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने कोरिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सात्विक आणि चिराग यांचा सामना २०२१च्या विश्वविजेत्या चीनच्या वेई केंग लियांग आणि चांग वांग या दुसऱ्या मानांकित जोडीशी झाला. चीनच्या वर्चस्वाला धक्का देत या भारतीय जोडीने हा सामना २१-१५, २४-२२ असा जिंकला आणि प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. इंडोनेशिया ओपन जिंकल्यानंतर या जोडीने प्रथमच स्पर्धेत प्रवेश केला.भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा कमाल करत चिनी वर्चस्व खालसा केले आहे. भारतीय जोडीने शनिवारी कोरिया ओपन २०२३च्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 

अश्विनने व्हीव्हीएस लक्ष्मणला मागे टाकत केला विक्रम

भारत आणि वेस्ट इंडिज संघांत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदाद येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करतान आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ४३८ धावा. या सामन्यात विराट कोहली पाठोपाठ रविंचंद्रन आश्विन देखील अश्विन उत्कृष्ट लयीत दिसत आहे. पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही त्याने आपल्या बॅटने एक पराक्रम केला आहे.भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि जडेजाच्या महत्त्वपूर्ण विकेट पडल्यानंतर आश्विनने भारतीय संघाचा डाव सावरला. या दरम्यान रविचंद्रन आश्विनने ५६ धावांची खेळी केली. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रविचंद्रन आश्विन सहाव्या क्रमांकाच्या खाली फलंदाजी करताना भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. त्याने या बाबतीत अनुभवी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणला मागे टाकले आहे.

मालेगाव हादरले! गुप्तधनासाठी 9 वर्षाच्या मुलाचा नरबळी

गुप्तधनाच्या लालसेपोटी 9 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाचं अपहरण करून नरबळी दिल्याच्या आरोपावरून बापलेक, मेहुणा आणि भोंदुबाबा यांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.गेल्या आठवड्यात रविवारी १६ जुलै रोजी कृष्णा सोनवणे हा ९ वर्षाचा मुलगा शेतात जातो म्हणून घरातून गेला होता. त्यानंतर दिवसभर तो घरी परतला नाही आणि बेपत्ता झाला होता. दोन दिवसांनी १८ जुलै रोजी त्याचा मृतेदह पोहाणे गावच्या शिवारात आढळला होता. गळा चिरलेल्या आणि मातीच्या ढिगाऱ्यात पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं नरबळीची शंका व्यक्त केली जात होती.

चार्ली चॅप्लिनची मुलगी जोसेफिन चॅप्लिनचं निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिग्गज कॉमेडी कलाकार चार्ली चॅप्लिनच्या कुटूंबाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. चार्ली चॅप्लिनची मुलगी आणि अभिनेत्री जोसेफिन चॅप्लिन हिचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे.ती चार्ली चॅप्लिनच्या 11 मुलांपैकी सहाव्या क्रमांकाची मुलगी होती. असिफीनच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेत्री जोसेफिनने 1967 मध्ये “अ काउंटेस फ्रॉम हाँगकाँग” या चॅप्लिन चित्रपटात काम केले. याशिवाय “द मॅन विदाऊट अ फेस” आणि “शॅडोमन” अशा सिनेमांमध्ये जोसेफिन झळकली आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.