हवामानात बदल झाल्याने राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी तुरळक आणि जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी गारपीटही झालेली आहे. अवेळी आलेल्या या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. राज्यात पावसाची ही स्थिती अजून दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. याशिवाय दोन दिवसानंतर तापमान पुन्हा वाढू लागणार आहे.
अरबी समुद्रातून सध्या उत्तर-पश्चिाम भारतात बाष्पाचा पुरवठा होत असल्याने या भागात पाऊस होतो आहे. राज्यातही हवेची चक्रीय स्थिती आहे. त्याचप्रमाणे सध्या कर्नाटकच्या किनाऱ्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. याच स्थितीमुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाऊस आहे. मराठवाडा आणि विदर्भात या दरम्यान गारपीटही झाली. कमी दाबाचे क्षेत्र क्षीण होत असले, तरी राज्यात आणखी दोन दिवस पावसाचे सावट राहणार आहे. काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह कोकण विभागातही तुरळक ठिकाणी पाऊस होईल. काहीठिकाणी हवेचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे.
सोमवारी दुपारी मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह महाबळेश्वरमध्ये जोरदार सरी कोसळल्या. विदर्भातील अकोला, चंद्रपूर आदी जिल्ह््यात संध्याकाळी साडेपाचपर्यंत पावसाची नोंद झाली. औरंगाबादसह मराठवाड्यात सोमवारी पुन्हा पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे मोठे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसात १८४ गावातील पिके बाधित झाल्याचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविले आहेत. एकूण दोन हजार ५३८ हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तापमानात होणार वाढ
राज्यात सध्या पावसाची स्थिती असल्याने सर्वच ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानात घट होऊन ते सरासरीच्या तुलनेत कमी झाले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, रात्रीचा उकाडाही कमी आहे. मात्र, दोन दिवसांनंतर राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. परिणामी २५ मार्चनंतर दिवसाच्या कमाल तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.