राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असून विशेषत: कोकण मुंबई, पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि पुण्यातील घाटमाथ्याच्या काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये दोन महत्त्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून मुंबईत पावसाचा जोर आहे.
पनवेल आणि परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. येथील खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या खालचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. कामावरून परतणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. प्रवाशी पाण्यातून वाट काढताना दिसले. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून NDRF पथके राज्यात विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. मुंबईसाठी 5 पथके, नागपूरला एक टीम, चिपळूणसाठी एक टीम, रत्नागिरी आणि महाड रायगड साठी एक टीम देण्यात आली आहे.
दरम्यान, पुढील 5 दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर मान्सून अधिक सक्रिय होण्याची स्थिती आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड भागात होऊ शकते. परिणामी महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार-पाच दिवस मान्सून कोकणात अधिक सक्रिय होणार आहे. मुंबई ठाणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.