उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंचं टेन्शन वाढवलं आहे. शिंदे गटाच्या वतीने निवडणूक आयोगाला टप्प्या टप्प्याने जवळपास दीड लाख प्रतिज्ञापत्रं देण्यात आलेली आहेत. शिंदे गटाच्या वतीने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण आणि पक्षावर दावा करण्यात आला आहे, त्यासाठी ही शपथपत्र देण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार कागदपत्रं देखील शिंदे गटाने दिल्याची माहिती आता समोर आली आहे.
एकीकडे शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्रं दाखल केलेली असतानाच ठाकरे गटाने मात्र कागदपत्रं देण्यासाठी आणखी 4 आठवड्यांचा वेळ मागितला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण आता 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे सोपावण्यात आलं आहे.
गुरुवारी 25 ऑगस्टला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सर्व प्रकरणांची सुनावणी होणार आहे. तसंच, जोपर्यंत सुनावणी सुरू आहे, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला आहे. ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांची मुदत देण्याची विनंती केली आहे.
निवडणूक आयोगामध्ये काय होणार?
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्रं देण्यात आल्यानंतर या सगळ्याची छाननी निवडणूक आयोगाकडून होईल. ही छाननी झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वेळ जास्त जाणार असल्यामुळे मध्ये निवडणुका आल्या तर शिवसेनचं धनुष्यबाण हे चिन्हं गोठवलंही जाऊ शकतं. या परिस्थितीमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाला वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल.