आज दि.२३ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

इंडियन आर्मी आता JEE Mains च्या मार्कांवर करणार भरती

इंडियन आर्मीमध्ये जॉब करू इच्छिणाऱ्या बारावीची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी खूशखबर आहे. भारतीय सैन्याच्या 10+2 Technical Entry Scheme (TES) – 48 अंतर्गत लवकरच नव्वद पदांसाठी भरती होणार आहे. विशेष म्हणजे ही पदभरती ही JEE Mains च्या मार्कांच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे JEE Mains मध्ये चांगले मार्क्स आहेत त्यांना इंडियन आर्मीत नोकरीचा गोल्डन चान्स मिळणार आहे.

या पद्भारतीसाठी जे उमेदवार पात्र आहेत ते joinindianarmy.nic.in या लष्कराच्या अधिकृत साइटद्वारे अर्ज करू शकतात. 22 ऑगस्टपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे उमेदवारांना 21 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी असणार आहे.

सरकारी कार्यालयात सुरू झाले पाळणाघर, आई-बाबांची काळजी मिटली

अनेक ठिकाणी पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतात. यामुळे मुलांना सांभाळण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यात बहुतांश घरात लहान मुलांना सांभाळणारे आजी-आजोबा शहरी भागात दिसत नाहीत. यासाठी मुलांना पाळणाघरांत ठेवले जाते. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठीही डे-केअर असावे म्हणून राज्यकर जीएसटी  सहआयुक्त जी. श्रीकांत यांच्या पुढाकारातून राज्यातील पहिले शासकीय कार्यालयातील डे-केअर सेंटर औरंगाबाद येथील जीएसटी कार्यालयात सुरु करण्यात आले आहे.

शासकीय नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी रजा मिळत असते . मात्र, त्यानंतर कामावर रुजू झाल्यावर नोकरी करून मुलांना सांभाळणे अडचणीचे जाते. राज्यकर जीएसटी कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांना बाळ सांभाळण्यासाठी अडचण येत असल्यामुळे सातत्याने सुटी घ्यावी लागत होती. ही अडचण जी. श्रीकांत यांच्या लक्षात आली. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याकडून शंभर रुपये कर्मचारी कल्याण निधीत जमा करीत हे डे-केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

पवार बोलायला लागले अन् फडणवीस-पाटील यांची जुंपली! अखेर अध्यक्षांनी मिटवला वाद

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विधिमंडळाचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सत्ताधारीही विरोधकांना सडेतोड उत्तर देत आहेत. मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यात खडाजंगी झाली. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला.

मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता मंत्रालयाच्या छतावर, आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईमध्ये शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता मंत्रालयाच्या छतावर चढला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी या कार्यकर्त्याने मंत्रालयाच्या छतावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. युवराज चौहान, असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.दरम्यान आज मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतलं. सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे उस्मनाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी आहे. आज दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकनाथ खडसेंची ‘फडणवीस स्टाईल’!, विधानपरिषदेत टाकला पेन ड्राईव्ह बॉम्ब

विधिमंडळाच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला. महाविकासआघाडी सरकारच्या काळातील विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचं स्टिंग ऑपरेशन या पेन ड्राईव्हमध्ये होतं. फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. फडणवीस यांच्यानंतर आता एकनाथ खडसे यांनीही विधिमंडळात असाच पेन ड्राईव्ह डेटा जमा केला आहे. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातला डेटा या पेन ड्राईव्हमध्ये असल्याचं खडसे म्हणाले आहेत.

मराठमोळ्या श्वानांवर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी; मुधोळ हाऊंड मोदींच्या रक्षणासाठी होणार तैनात

देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला कायमच धोका असतो, त्यामुळं या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था तैनात केलेली असते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशातीलच नाही, तर संपूर्ण जगातील प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत. धाडसी निर्णय घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. परंतु त्यामुळं त्यांच्या सुरक्षेची मोठी काळजी घेतली जाते. अत्याधुनिक अशा गाड्यांपासून ते विशेष प्रशिक्षण घेतलेले आणि घातक शस्त्रांस्त्रांनी सज्ज असे बॉडीगार्ड पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कायम तैनात असतात. परंतु आता पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी नवा प्लॅन बनवला गेलाय. येथून पुढं पंतप्रधानांच्या नियमित सुरक्षा व्यवस्थेत आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे. ते म्हणजे मुधोळ हाऊंड श्वान. मुधोळ हाऊंड श्वान इथून पुढे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग असणार आहेत. विशेष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्येही या मुधोळ हाऊंडनी मोठं शौर्य गाजवलं होतं. आता हेच श्वान  मोदींच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.