RBI ची बँकांवर धडक कारवाई, ठोठावाला दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंजाब अँड सिंध बँकेला (Punjab and Sind Bank) 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, Punjab and Sind Bank ने रिझर्व्ह बँकेच्या सायबर सुरक्षा नियमावलीचे पालन केले नाही. 16 आणि 20 मे रोजी बँकेला याबाबत सूचित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बँकेने निष्काळजीपणा सुरुच ठेवल्याने RBI ने दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच बँकेला कारण द्या नोटीसही बजावण्यात आली आहे.

याशिवाय, रिझर्व्ह बँकेने इटावा येथील नगर सहकारी बँकेवरही दंडात्मक कारवाई केली. या बँकेला 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकेनेही नियमांची पायमल्ली केल्याच ठपका रिझर्व्ह बँकेकडून ठेवण्यात आला आहे.

सारस्वत आणि एसव्हीसी सहकारी बँकेवर कारवाई
भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक (Saraswat Co-operative Bank Ltd) आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा (SVC Bank) समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे 25 लाख आणि 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वी महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांवर कारवाई
काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने राज्यातील तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला (Indapur Urban Cooperative Bank) 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला (The Baramati Sahakari Bank Limited) एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.