राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) सर्वोच्च न्यायालयात एक मोठा खुलासा केला आहे. आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिल 2020 पासून कोरोना महामारीच्या काळात देशातील 1 लाख 47 हजार 492 मुलांनी त्यांचे आई, वडील किंवा दोघेही गमावले आहेत. गेल्या दोन वर्षांत अनाथ मुलांच्या पालकांपैकी बहुतेकांना कोरोनाव्हायरस किंवा इतर कोणत्या तरी घटनेमुळे आपला जीव गमवावा लागला असल्याचं NCPCR ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
एनसीपीसीआरने ही माहिती सुओमोटोशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला दिली. यामध्ये सुप्रीम कोर्टाने आयोगाला विचारले होते की, कोरोना महामारीदरम्यान आई-वडील गमावलेल्या मुलांची संख्या किती आहे? याबाबत एनसीपीसीआरने ही आकडेवारी न्यायालयाला दिली. आयोगाने असंही म्हटले आहे की त्यांचा डेटा 11 जानेवारी 2021 पर्यंतचा आहे आणि ‘बाल स्वराज पोर्टल – कोविड केअर’ मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या डेटाच्या आधारे गोळा केला गेला आहे.
11 जानेवारीपर्यंत अपलोड केलेल्या डेटावरून NCPCR ने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2020 पासून आतापर्यंत देशात आई आणि वडील दोघांनाही गमावलेल्या मुलांची संख्या 10 हजार 94 इतकी होती. तर आई किंवा वडिलांपैकी एक गमावलेल्या मुलांची संख्या 1 लाख 36 हजार 910 इतकी आहे. याशिवाय सोडून दिलेल्या मुलांची संख्या 488 आहे. ही सर्व आकडेवारी धरली तर देशात आई-वडील गमावणाऱ्या मुलांची संख्या 1 लाख 47 हजार 492 वर पोहोचली आहे.
पालक गमावलेल्या मुलांमध्ये 76 हजार 508 मुलं आहेत, तर 70 हजार 980 मुली आहेत. चार ट्रान्सजेंडर मुलांचाही यामध्ये समावेश आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, साथीच्या काळात सर्वाधिक प्रभावित झालेल्या मुलांमध्ये 8 ते 13 वयोगटातील 59,010 मुलं, 14-15 वयोगटातील 22 हजार 763, 16-18 वयोगटातील 22,626 बालकांचा समावेश आहे. याशिवाय, चार ते सात वयोगटातील 26,080 मुलांनी, आई किंवा वडील किंवा दोघेही या काळात गमावले आहेत.
एप्रिल 2020 पासून कोविड आणि इतर कारणांमुळे ज्या मुलांनी आपले पालक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत त्यांचा राज्यवार तपशील देताना आयोगाने सांगितले की अशा मुलांची सर्वाधिक संख्या ओडिसात 24, 405 इतकी आहे. तर या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 19, 623 मुलांनी आपले पालक गमावले आहे. त्यानंतर गुजरात 14,770, तामिळनाडू 11,014, उत्तर प्रदेश 9,247, आंध्र प्रदेश 8,760, मध्य प्रदेश 7,340, पश्चिम बंगाल 6,835, दिल्ली 6,629 आणि राजस्थानचा 6,827 क्रमांक लागतो.
आई-वडील गमावलेल्या मुलांची काय अवस्था आहे?
एनसीपीसीआरने मुलांच्या निवारागृहाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. त्यानुसार, सर्वाधिक 1,25,205 मुले आई किंवा वडिलांकडे आहेत, तर 11,272 कुटुंबातील सदस्यांसह आणि 8,450 नातेवाईकांकडे आहेत. 1,529 मुलं बालगृहात, 19 निवारागृहात, दोन निरीक्षण गृहात, 188 अनाथाश्रमात, 66 विशेष दत्तक संस्थांमध्ये आणि 39 वसतिगृहात असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.