राणा दाम्पत्याला 14 दिवसांची
न्यायालयीन कोठडी
आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेले रवी राणा आणि नवनीत राणा यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज सुनावणीनंतर राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आक्षेपार्ह वक्तव्य आणि समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा यांच्यावर आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. प्रदीप घरत यांनी बाजू मांडली तर, राणा दाम्पत्याच्या वतीने ऍड मर्चंट रिझवान यांनी बाजू मांडली. राणा दाम्पत्याने जामीनासाठी अर्ज केला. मात्र जामिनावर सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
लता मंगशेकर पुरस्कार सोहळ्यासाठी मोदी मुंबईत, कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत?
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा आज म्हणजेच 24 एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र व्यासपीठावर येणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज होणाऱ्या लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्यास गैरहजर राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज संध्याकाळी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित रहाण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्तं केली आहे.
राणा दाम्पत्यावर वेगवेगळ्या
ठिकाणी गुन्हे दाखल
नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यावर गुन्हा नोंदवण्याची तक्रार शिवसेनेने उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात केलीय. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मुंडे यांच्यासह 4 जणांनी राणांवर गुन्हा नोंदवण्याची तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरले आणि दोन समाजात तेढ निर्माण करून तणावाचं वातावरण निर्माण करत राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप त्यांनी केलाय. जर गुन्हा दाखल केला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय.
किरीट सोमय्या यांना पोलीस स्टेशनमध्ये
जाण्याची गरज नव्हती : गृहमंत्री पाटील
किरीट सोमय्या यांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नव्हती. खरंतर कस्टडीमध्ये असलेल्या लोकांना भेटण्यासाठी फक्त वकील आणि नातेवाईकांना परवानगी असते. त्यामुळे तिथे जाऊन विनाकारण संघर्ष वाढला. झालं ते वाईटचं झालं. असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. राणा दाम्पत्याच्या या कृतीमागे, मोठी शक्ती कार्यरत आहे. त्याशिवाय ते हे काम करू शकत नाही. अशी शक्यताही वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमानाचे,
उष्णतेची लाट आणि गारपीटची शक्यता
राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. कारण राज्यात आज उद्या अवकाळी पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार आज अनेक ठिकाणी पाऊसही झाला. तर त्यानंतर 25 ते 27 तारखेपर्यंत राज्यातल्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर 25 ते 27 एप्रिलपर्यंत विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळसह, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार आहे.
राज्यात सुडाचे राजकारण राष्ट्रपती
राजवट लागू करा : नारायण राणे
नारायण राणेंनी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. “जेव्हा राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित सांभाळत नाही. सुडाचं राजकारण करतात. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट राज्यात येणं गरजेचं आहे”, असं नारायण राणे म्हणाले. नारायण राणे म्हणाले, “राज्यात बेबंदशाही चालू आहे. जे सत्तेत आहेत, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्यांचेच कार्यकर्ते धांगडधिंगा, मारझोड करत आहेत. एका व्यक्तीला मारायला ७०-८० लोक येतात. तेही एक राजकीय पुढारी आहेत.
प्रियंका गांधी यांच्याकडील पेटिंग
खरेदी करण्यासाठी आणला दबाव
येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलाय. प्रियंका गांधी यांच्याकडील चित्रकार एम. एफ. हुसेन यांची २ कोटी रुपयांची पेटिंग खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव आला होता, असा आरोप राणा कपूर यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबात केलाय. ईडीने विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, पेंटिंगच्या विक्रीतून आलेले २ कोटी रुपये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या न्यू यॉर्कमधील उपाचारासाठी वापरण्यात आल्याचा दावाही राणा यांनी केलाय.
जम्मू-काश्मीरमध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘तुमच्या पूर्वजांनी जगलं तसं आयुष्य तुमच्या वाट्याला मी येऊ देणार नाही’
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरला 20 हजार कोटींचे प्रकल्प भेट दिले. ऑगस्ट 2019 मध्ये, पंतप्रधान मोदींनी येथून आर्टिकल 370 हटवल्यानंतर प्रथमच काश्मीर खोऱ्याला भेट दिली. या वेळी, ते म्हणाले की, गेल्या 2-3 वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचे नवे आयाम प्रस्थापित झाले. यावेळी मोदींनी 3100 कोटींहून अधिक खर्चून बांधलेल्या बनिहाल काझीगुंड रोड बोगद्याचं उद्घाटन केलं. पल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी 500 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटनही केलं. यामुळे ही कार्बन न्यूट्रल बनणारी देशातील पहिली पंचायत बनली.
सांबा येथील पंचायती राज दिन सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, तुमचे पूर्वज जे आयुष्य जगले, ते आयुष्य तुमच्या वाट्याला मी येऊ देणार नाही.
दिल्लीतील ४० गावांची नावे
बदलण्याची भाजपची मागणी
दिल्लीतील ४० गावांची नावे बदलण्याची मागणी भाजपाने दिल्ली सरकारकडे केली आहे. गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या या गावांची नावे बदलावी, असे भाजपाचे म्हणणे आहे. चिन्हांकीत केलेल्या गावांची नावे बदलण्याचा प्रस्ताव दिल्ली एमसीडी लवकरच स्वीकारेल आणि दिल्ली सरकारकडे पाठवेल. भाजपाने दिल्ली सरकारवर आरोप केला आहे की दक्षिण दिल्ली एमसीडीने मोहम्मदपूर गावाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पाच महिन्यांपूर्वी सरकारला पाठवला होता, परंतु दिल्ली सरकारने तो थंडबस्त्यात ठेवला आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या फोटो समोर
IAS अधिकारी टीना डाबी यांचा विवाह
IAS अधिकारी टीना डाबी यांचा विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोडळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टीना डाबी या 2016 च्या UPSC टॉपर आहेत. प्रदीप गावंडे यांच्यासोबत जयपूरमध्ये त्यांनी सात जन्माची लग्नगाठ बांधली.टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांनी खास मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. व्हायरल झालेल्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांनी पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान केला होता. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला साक्षी मानून 7 जन्मासाठी वचनं घेतली.
टीम इंडियाच्या खेळाडूला धमकावणं
पत्रकाराला महागात पडणार
टीम इंडियाच्या खेळाडूला धमकावणं पत्रकाराला महागात पडणार आहे. बीसीसीआय या पत्रकारावर 2 वर्षांची बंदी घालू शकते. बोरिया मजूमदार या पत्रकाराने काही महिन्यापूर्वी धमकावल्याचा आरोप विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा याने केला होता. साहाने ट्विट करत व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. यानंतर या सर्व वादाला तोंड फुटलं होतं. साहाने स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर बीसीसीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. बीसीसीआयने सर्व प्रकरणाची चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली.
SD social media
9850 60 3590