कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) स्थगित झाल्यामुळे क्रिकेट रसिक निराश झाले. परंतु त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सीपीएल (CPL) अर्थात कॅरेबिअन प्रिमीअर लीगची घोषणा केली आहे. त्यामुळे युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल, आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन यांचं वादळ पुन्हा मैदानात घोंघावणार आहे. 28 ऑगस्टला स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. तर 19 सप्टेंबर रोजी सीपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने, कॅरेबियन प्रीमियर लीगचं नववं सत्र 28 ऑगस्टपासून सुरू होईल. सुमारे एक महिन्यापर्यंत चालणार्या लीगचा अंतिम सामना 19 सप्टेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केवळ दोन मैदानावरच सामन्यांचं आयोजन होणार आहेत. सेंट किट्स आणि नेव्हिस या दोन मैदानांवर सामने खेळविले जाणार आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये नेहमीच वेस्ट इंडिजच्या क्रिकेटर्सचा दबदबा राहिलेला आहे. त्यांच्या आक्रमक खेळाने त्यांनी नेहमीच जगभरातील क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. दरवर्षी सीपीएलच्या माध्यमातून वेस्ट इंडिज क्रिकेटपटू चौकार-षटकारांचे अनेक विक्रम रचतात. ख्रिस गेल, आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन, शिमरन हेटमायर यांसारख्या दिग्गजांचा खेळ सीपीएलमध्ये बघायला मिळत असतो.
कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सहा संघ सहभागी होतील. गतविजेत्या ट्रिनबागो नाइट रायडर्सने लीग सुरू होण्यापूर्वी प्रवीण तांबे, टिम सेफर्ट, फवाद अहमद आणि आमिर झांगू यांना संघातून वगळलंय. ट्रिनबागो नाइटने दिनेश रामदिनला संघात घेतलंय. त्याच वेळी, सेंट लुसिया ज्यूक्स संघाने सात खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरच्या मोसमात सात गुणांसह गुणतालिकेत संघ तिसऱ्या क्रमांकांवर होता . यावर्षी वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी सीपीएलमध्ये भाग घेणार नाही.