काँग्रेसची अवस्था एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. पवारांच्या या विधानाशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असहमती दर्शविली आहे. तसेच पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असं खुलं आवतनच बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना दिलं आहे. त्यामुळे थोरात यांच्या या आवतनावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी बोलताना शरद पवार यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. तसेच काँग्रेसची अवस्था जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे या पवारांच्या विधानाशी असहमत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पवारांच्या विधानाशी मी असहमत आहे. त्यांच्या विधानाचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधकांनी या विधानाचा कितीही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसचं काही नुकसान होणार नाही. पण अपेक्षा अशी आहे की, या विचाराचे जे आहेत. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाशी जे बांधिल आहेत. त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा बरोबर यावं. एकत्रं यावं. काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्रं लढाई करावी, असं आवाहन थोरात यांनी केलं.
काँग्रेस हा एक विचार आहे. काँग्रेसच्या विचारला कठीण दिवस आले आहेत. कारण धार्मिक भेदाभेद करणारे वाढले आहेत. आपण एका विचाराचे आहोत. आपण सर्व एकत्र आलो तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसी आरक्षण प्रश्नावर आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन काम करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलाय त्यावर आम्ही चर्चा करू. सर्वांना सोबत घेऊन चर्चा करूनच आम्ही त्यावर निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं.
हे वर्ष नैसर्गिक संकटाच आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे चालू आहेत. त्यामुळे पंचनामे आल्यावरच त्यावर काय मदत करायची हे ठरवलं जाईल. आज त्यावर बोलणं योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.