धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे बारवी धरणापाठोपाठ भातसा धरण ओव्हर फ्लो झालं आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्याची पाण्याची चिंता मिटली असल्याचं सांगितलं जात आहे.
एक हप्त्यापासून शहापूर तालुक्यत रोज पडत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे या शेहरांना पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण हे 99 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे अडीच सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून 190.89 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सापगाव येथील भातसा नदीच्या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील महिन्यात भातसा धरण काठोकाठ भरलं होतं. त्यामुळे धरणाचे 3 दवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर हे दरवाजे दुसऱ्या दिवशी लगेच बंद करण्यात आले होते. आता मात्र धरण 99% भरले असून धरणाचे 5 दरवाजे हे उघडण्यात आले आहेत
दरम्यान संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बदलापूरचं बारवी धरण अखेर 8 सप्टेंबर रोजी भरलं आहे. त्यामुळे बारवी धरणाच्या 11 स्वयंचलित दरवाजांपैकी 9 दरवाजांमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यंदाच्या वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे बारवी धरण दरवर्षीच्या तुलनेत काहीसं उशिरा भरलं. जुलै महिन्याअखेर झालेल्या मुसळधार पावसाने बारवी धरण 50 टक्क्यांवरून थेट 85 टक्क्यांपर्यंत भरलं होतं. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे सप्टेंबर महिना उजाडला तरीही धरण पूर्णपणे भरलं नव्हतं. त्यामुळे यंदा धरण भरणार की नाही? याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. मात्र सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने केलेल्या जोरदार बॅटिंगमुळे बारवी धरण 100 टक्के भरले असून 8 सप्टेंबर रोजी रात्री हे धरण पूर्ण क्षमतेनं ओव्हरफ्लो झालं आहे.
बारवी धरणाची उंची 72.60 मीटर इतकी असून सध्या धरणात 340 एमसीएम इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर या महानगरपालिका, तसंच अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका, त्याचप्रमाणे एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकारणांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरण भरल्यानं ठाणे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला असून ठाणे जिल्ह्याची चिंता आता वर्षभरासाठी मिटली आहे.