जून महिन्यात पावसाचा जोर कमी असल्याने यंदा पाऊस पडेल की नाही अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. 14 दिवसांत झालेल्या पावसाने सर्वसामान्यांपासून शेतकऱ्यांची दैना उडवून दिली आहे. दरम्यान कालपासून राज्यातील काही भागात पावसाने उसंत घेतल्याने महापुराचा धोका टळल्याचे बोलले जात आहे.
मुसळधार पावसाने आता विश्रांती घेतली असली तरी पुढच्या तीन दिवसानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. परंतु अरबी समुद्रातील उत्तर पूर्व भागापासून ते सौराष्ट्र, कच्छच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.
या पट्ट्याचे रूपांतर 24 तासांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता असल्याने 21 जुलैनंतर पुन्हा राज्यात विशेषत: कोकणात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जुलै महिन्याची सरासरी राज्याने ओलांडली आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. तरीदेखील 19 जुलैपर्यंत काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. दरम्यान, गुजरातची किनारपट्टी ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे.
राज्यातील या भागात येलो अलर्ट : कोल्हापूर – 16 जुलै, रायगड, रत्नागिरी – 16 ते 19 जुलै, पुणे (घाट), सातारा (घाट)-16 जुलै, परभणी, हिंगोली, नांदेड- 17, 18 जुलै, नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा- 16, 17 जुलै, चंद्रपूर – 16 ते 19 जुलै, गोंदिया – 16, 18 जुलै, वर्धा, वाशिम, यवतमाळ – 16, 17 जुलै.