पंतप्रधानांना थेट जनता मतदान करत नाही, मग…,अजित पवारांचा शिंदे सरकारला सवाल

शिंदे आणि भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून मविआने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली जात आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. पण, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना थेट जनता मतदान करत नाही, मग थेट सरपंचच का जनतेतून निवडला जातो? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला केला आहे.अजित पवार हे खेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी खेड तालुक्यातील चाकण येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजितदादांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

राज्यात होऊ घातलेल्या सहकाराच्या निवडणुका ३० सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून ही लोकशाहीची थट्टा चेष्टा चालली असून यात लोकशाहीचा खुन पाडला जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

‘राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना संपूर्ण जनता मतदान करत नाही मग थेट सरपंचच का जनतेतून निवडला जातो? असा सवाल उपस्थित करत, ज्याच्याकडे मनी पॉवर, मसल पॉवर जास्त अशी लोकं सरपंच होतात आणि अशा वेळेस सर्वसामान्य काम करणाऱ्या व्यक्ती वरती अन्याय होतो. त्यामुळे थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीवरती अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत शिंदे फडणवीस सरकारवर निशाना साधला.

थोडी तरी लाज बाळगा, अजितदादा संतापले

तसंच, मुख्यमंत्र्यांकडून उद्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आमदारांना डिनर दिला जाणार आहे. तर उपमुख्यमंत्र्यांकडून रविवारी दोन्ही पक्षाच्या आमदारांना डिनर दिलं जाणार आहे. राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीकरता या स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारची ही डिनर डिप्लोमसी आहे. दोन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्रित डिनरसाठी बोलावलं जाणार आहे. दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण, राज्यावर अतिवृष्टीचं संकट ओढवलेलं असताना सत्ताधारी पक्ष फाईव्ह स्टार हॉटेलमधून आमदारांच्या जेवणावळी उठवताहेत, हे बरोबर नाही जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.