कोरोनाच्या दोन लाटांनीच सगळ्यांना नको नको करुन सोडलं. आता पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि ही लाट पहिल्या दोन लाटांपेक्षा अधिक डेंजर असेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत सगळ्यांचीच चिंता वाढवणारी बातमी मराठवाड्यातून आहे. कोरोनाची तिसरी लाट इतकी डेंजर असेल की एकट्या मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल, अशी शक्यता औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वर्तवली आहे.
पहिल्या दोन लाटेत मराठवाड्यात कोरोना रुग्णांनी विक्रम केला. तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झाला तर दुसऱ्या लाटेपेक्षा दीडपट रुग्णसंख्या वाढेल, असं गृहित धरुन प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी सहा उपायुक्तांची विशेष कोअर टीम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्थापन केली आहे.
तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झाल्यास दुसऱ्या लाटेच्या दीडपट कोरोना रुग्णसंख्या असेल हे गृहीत धरुन आरोग्य सुविधांचं सर्वोच्च पातळीवर नियोजन असावे, या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. येत्या काही दिवसात विभागातील पूर्ण जिल्ह्यात विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी स्थापन केली जाणार असून त्याची औषधे आरोग्य सुविधा नवजात शिशु उपचार व्यवस्था ऑक्सीजन सिलेंडर साठा याची माहिती घेणार आहोत
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची 5 तास बैठक घेतली. या बैठकीत सखोल चर्चा केल्यानंतर 6 जणांची विशेष कोअर टीम स्थापन केली. महसूल उपायुक्त पराग सोमण, उपायुक्त वीणा सुपेकर, जगदीश मिनीयार, अविनाश पाठक, शिवाजी शिंदे आणि रश्मी खांडेकर यांचा या टीममध्ये समावेश आहे.
कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी केरळने केलेल्या प्रयत्नांची जगभरात दखल घेतली गेली, केरळच्या सरकारची जगभरात वाहवा झाली. पण आता त्याच केरळमध्ये पुन्हा एकदा भरमसाठ रुग्ण वाढू लागले आहेत. असं असलं तरी तिथे मृत्युदर मात्र कमी आहे. गेल्या 4 आठवड्यापासून तिथे अधिक रुग्ण वाढ होतीय. भारतात कोरोनाची तिसरी लाट अद्याप आली नसली तरी तिची सुरुवात केरळमधून होण्याची शक्यता वर्तवली जातीय.
डेल्टा व्हेरिएंट या जीवघेण्या कोरोनाच्या प्रकाराचा जगभरातील 132 देशांत प्रसार झाला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. लसीकरणाची गती वाढवायला हवी नाहीतर डेल्टा अधिक धोकादायक ठरणार असल्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. तसंच लस न घेतलेल्या लोकांकडून अधिक संसर्ग वाढू शकतो, असा अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल आहे.
(फोटो क्रेडिट गुगल)