पुलवामा जिल्ह्यात बिगर कश्मीरी नागरिकांवर दहशतवाद्यांचा गोळीबार

कश्मीर खोर्‍यात दहशतवादी हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मोहिम तीव्र केली असतानाच दहशतवाद्यांनी हल्ल्यांचे सत्र सुरू ठेवले आहे. त्यातही विशेषतः बिगर कश्मीरींना टार्गेट करण्याचे प्रमाण वाढले आहे. पुलवामा जिल्ह्यात एका बिगर कश्मीरी नागरिकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात तो नागरिक गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गोळीबार करून फरार झालेल्या दहशतवाद्यांचा पोलिस आणि लष्कराच्या पथकांमार्फत शोध घेतला जात आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या बिगर कश्मीरी नागरिकाचे सोनू शर्मा असे नाव आहे. तो पंजाबमधील पठाणकोटचा रहिवासी आहे. स्थानिक लोकांनी त्याला पुलवामाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पाच दिवसांत तिसर्‍यांदा बिगर कश्मीरी नागरिकावर हल्ल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जम्मू-कश्मीरात रोजगारासाठी आलेल्या बिगर कश्मीरींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कश्मीर खोर्‍यात बिगर कश्मीरींवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.

अलीकडेच श्रीनगरच्या ट्यूलिप गार्डनजवळ दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटात ऑटोचालकाचा मृत्यू झाला. जम्मू जिल्ह्याचा नोंदणी क्रमांक असलेल्या व्हॅनच्या चालकाने पार्किंग क्षेत्राजवळ वाहनाचा मागील दरवाजा उघडला. त्यावेळी हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्याची जबाबदारी जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यात चुंबकीय आयईडीचा वापर करण्यात आल्याचे टीआरएफने म्हटले आहे. गुरुवारीही दहशतवाद्यांनी सोनू शर्मा या चालकावरच गोळ्या झाडल्या. पुलवामाच्या यादेर परिसरात ही घटना घडली.

कश्मीरी पंडितही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
दहशतवाद्यांनी सोमवारी शोपियाँ जिल्ह्यात एका कश्मीरी पंडितावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यात तो पंडित गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी 24 तासांत 4 हल्ले करून संपूर्ण कश्मिर खोरे हादरून टाकले होते. दक्षिण काश्मीरातील शोपियाँ जिल्ह्यातील चित्रगाम येथील रहिवासी असलेल्या कश्मिरी पंडित सोनूकुमार बलजी याने पलायनाच्या वेळी कश्मीर सोडले नव्हते. दहशतवाद्यांनी सोमवारी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. सोनूकुमार 30 वर्षांपासून कश्मीरात राहत आहे. दुसरीकडे श्रीनगरच्या मैसुमा येथील सीआरपीएफच्या कॅम्पवरही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता, तर एक जवान गंभीर जखमी झाला. लाल चौकाजवळ झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.