Delta Plus Variant मुळे प्रतिकारशक्ती
वेगाने निष्प्रभ होतेय : who
करोनाच्या Delta Plus Variant ची चर्चा सध्या जगभर सुरू आहे. करोना विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे प्रतिकारशक्ती वेगाने निष्प्रभ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी या प्रकाराची धास्ती घेतली असताना भारतातल्या १० राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात २० रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता वाढली असतानाच, जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट जगभरात आजपर्यंत सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनी देखील मास्क घालून ठेवणं आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
ओबीसींचं राजकीय आरक्षण जर परत
आणू शकलो नाही, तर राजकीय सन्यास
आज भाजपाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. नागपुरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालं. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, असल्याचं फडणवीस म्हणाले. याचबरोबर, पुढच्या तीन चार महिन्यात आपण ओबीसीच आरक्षण परत आणू शकतो. मी तर सांगतो, खऱ्या अर्थाने आमच्या हाती जर सूत्र दिली. तर मी दाव्याने सांगतो, ओबीसींचं राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही, तर राजकीय सन्यास घेईन, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
मनेका गांधी बद्दल भाजपच्या
आमदाराचे आक्षेपार्ह ट्विट
मध्य प्रदेशचे माजी आरोग्यमंत्री आणि पाटणचे भाजपाचे आमदार अजय बिष्णोई यांनी ट्वीट करून आपल्याच पक्षाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना ‘घटिया महिला’ म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी मेनका गांधींची एक ऑडिओ टेप व्हायरल झाली होती. ज्यानंतर त्यांच्यावर पशुवैद्यकांशी अभद्र भाषेत बोलल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे रस्ता बंद,
रुग्ण महिलेचा मृत्यू
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या कानपूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात सुरुक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकींच्या रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना गोविंदपुरी पुलावर वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेची प्रकृती अधिकच बिकट झाली आणि जेव्हा रुग्णालयात पोहोचली तेव्हा खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
देशमुख यांचे स्वीय सहाय्यक यांना
न्यायालयाने १ जुलैपर्यंत कोठडी
वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या ईडीने काल (२५ जून) दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर ईडीने दोघांनाही अटक केली. तसंच अनिल देशमुख यांनाही समन्स बजावले आहे. दरम्यान, ईडीच्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना न्यायालयाने १ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.
बनावट लसीकरणाच्या
खासदार मिमी चक्रवर्ती शिकार
देशात बनावट लसीकरणाला उत आला आहे. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री खासदार मिमी चक्रवर्ती देखील बनावट लसीकरणाच्या शिकार बनल्या आहेत. कोलकाता येथे कसबा परिसरातील लसीकरण शिबिरात गेलेल्या मिमी यांना कोविडची बनावट लस देण्यात आली. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान मिमी यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
Johnson & Johnson करोना लस
जुलै महिन्यात उपलब्ध होणार
जुलै महिन्यापासून जॉन्सन आणि जॉन्सनची करोना लस देशात उपलब्ध होऊ शकेल. यामुळे कोविड विरूद्ध लढा अधिक तीव्र होण्यास मदत होईल. Johnson & Johnson करोना लस खासगी क्षेत्रातून देशात खरेदी केली जाईल. खासगी क्षेत्र ही लस खरेदी करेल. त्यामुळे खासगी रुग्णालयात ही लस उपलब्ध असेल. सरकारने Johnson & Johnson च्या खरेदीबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. देशात करोनाविरूद्ध सरकारी लसीकरण प्रामुख्याने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनद्वारे चालू आहे.
अर्जुन पुरस्कारासाठी
खेळाडूंची शिफारस
भारताचा सर्वात प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंची शिफारस करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि माजी महिला हॉकीपटू दीपिका यांची शिफारस केली आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी हरमनप्रीत सिंग, वंदना कटारिया आणि नवजोत कौर यांची नावे पाठवण्यात आली आहेत.
प्रताप सरनाईक आजन्म
शिवसेनेत राहतील : राऊत
शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केंद्रीय तपास यंत्रणा आणि युतीसंदर्भात लिहिलेलं पत्र आणि सध्या राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या राजकारणावरुन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर राऊत यांनी प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्राविषयी महत्त्वाचं भाष्य केलं. तसंच प्रताप सरनाईक आजन्म शिवसेनेत राहतील आणि त्यांच्याविषयी लवकरच बातमी कळेल, असं विधान राऊत यांनी केलं.
Delta Plus Variant च्या पार्श्वभूमीवर
जळगाव जिल्ह्यात पुन्हा निर्बंध
रत्नागिरीसह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याचं निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. उद्यापासून निर्बंधांमध्ये वाढ केली आहे. संध्याकाळी पाच ते सकाळी पाचपर्यंत सोमवार ते शुक्रवार वैद्यकीय कारण व्यतिरिक्त नागरिकांना मुक्त संचार करण्यास बंदी केली आहे. शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
दूध दरासंदर्भात लवकरच
कायदा करणार
कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुधाचं दर कमी झाल्यानं संकट कोसळलं आहे. राज्यातील विविध संघटनांनी दूध दर वाढवण्यात यावा म्हणून आंदोलन देखील केलं होतं. दुधाचे दर कमी झाल्यानं शेतकरी संघटना, विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्यानंतर दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं.
पुण्यात निर्बंधाची स्थिती
जैसे थेच असणार
कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका लक्षात घेता येत्या आठवड्यात पुण्यात निर्बंधाची स्थिती जैसे थेच असणार आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेले निर्बंध आणखी शिथिल होतील अशी अपेक्षा पुणेकरांना होती. पुन्हा एकदा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका बघता पुण्यात तूर्तास जे निर्बंध लागू आहेत ते पुढे लागू राहणार आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.
SD social media
9850 60 3590