अणुउर्जा केंद्रावर स्फोट झाला, तर
तो युरोपचा शेवट असेल : झेलेन्स्की
अणुऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. या अणुऊर्जा केंद्रावर आग लागली असून त्यामुळे आता इथे स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी यासंदर्भात आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्यानंतर त्यासंदर्भात तातडीचा व्हिडीओ संदेश जारी केला आहे. या संदेशामध्ये झेलेन्स्की यांनी जगाला गंभीर इशारा दिला आहे. जर या अणुउर्जा केंद्रावर स्फोट झाला, तर तो सर्वांचा शेवट असेल. तो युरोपचा शेवट असेल. संपूर्ण युरोप रिकामा करावा लागेल”, असं झेलेन्स्की म्हणाले आहेत.
पाकिस्तानातील मशिदीत नमाजाच्या
वेळी बॉम्बस्फोट किमान 30 जण ठार
पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 30 जण ठार आणि 50 हून अधिक जखमी झाले, अशी माहिती जिओ न्यूजने दिली आहे. लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते मोहम्मद आसीम यांनी सांगितले, या ठिकाणी जखमींना आणण्यात आले आहे. त्यांनी रॉयटर्सला सांगितले की त्यांना 30 हून अधिक मृतदेह मिळाले आहेत. वायव्य पाकिस्तानी शहरात शुक्रवारच्या सभेदरम्यान गर्दीने भरलेल्या शिया मशिदीमध्ये बॉम्ब घडवून आणला गेला. यात किमान 50 जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 10 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा
प्रकल्पावर रशियाने घेतला ताबा
युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने ताबा घेतला आहे. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये चार मोठे स्फोट झाले आहेत. रहीवासी भागातही रशियाने हल्ले चढविण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनमधील झापोरीझ्झ्या अणुभट्टीवर रशियन फौजांनी ताबा मिळविल्यानंतर अनेक शहरांत रशियन सैन्याने शिरकाव केला आहे. रशिया हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनची नवी दृश्य समोर आली आहेत. कीव्ह शहरातली ही दृश्य आहेत. कीव्ह शहर अक्षरश: भकास झाले आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ड्रोनने टीपलेली अतिशय विदारक अशी ही दृश्य आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना
ठार मारण्याचे तीन प्रयत्न
रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीला आक्रमण केलं, तेव्हापासून या दोन्ही देशांदरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की त्यांच्या ठाम भूमिकेमुळे हिरो ठरू लागले आहेत. अशातच रशियाने गेल्या आठवड्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना ठार मारण्याचे तीन प्रयत्न केले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु तिन्ही वेळा हा प्रयत्न फसल्याची माहिती मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च
न्यायालयाने केंद्राला सुनावलं
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत कोणताही आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण यांनी न्यायालय सरकारला कोणताही आदेश देणार नाही, असे म्हटले आहे. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी उचलण्यात येणारी सर्व पावले, पालकांसाठी हेल्पलाइनची शक्यता इत्यादींबाबत केंद्र सरकारकडून सूचना घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने अॕटर्नी जनरल यांना सांगितले आहे.
एसटी विलीनीकरणाची
मागणी समितीने फेटाळली
मंत्री अनिल परब यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे.
उच्च न्यायालयाने विलीनीकरणाच्या संदर्भांत त्रिसदस्यीय समिती नेमली होती आणि निर्णय घेण्यास सांगितले होते. समितीने विलीनीकरणासंदर्भात जो निर्णय घेतला तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीने उच्च न्यायालयात सादर केला. न्यायालयाच्या सूचनेनंतर तो अहवाल मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात आला होता. अधिवेशन सुरु असल्याने तो विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला. या अहवालामध्ये कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी समितीने फेटाळली आहे. समितीने व्यवस्थित अभ्यास आपले मत न्यायालयाला कळवले. यामध्ये विलीनीकरण होणार नाही हे स्पष्ट केले आहे,” असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले.
मध्यप्रदेश सरकारने केलेल्या कायद्याच्या
आधारे निवडणूक घेता येऊ शकेल
ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळून हा अहवाल गृहीत न धरता निवडणूक घेण्यास न्यायालयाने सांगितले. त्यामुळे निवडणूक जाहीर होतील अशी चर्चा आहे. पण, ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या अधिकाराच्या कायद्यातच बदल करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेश सरकारने केलेल्या कायद्याच्या आधारे निवडणूक घेता येऊ शकेल असे सांगितले. विधान परिषदेत अजित पवार यांनी तसे सूतोवाच केले.
राज्यात करोनाची
तिसरी लाट ओसरली
राज्यात करोनाची तिसरी लाट ओसरत आली असून दैनंदिन रुग्णसंख्येसह मृत्यूच्या प्रमाणातही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. करोनाची तिसरी लाट जानेवारीमध्ये राज्यात वेगाने पसरत होती, त्यावेळी सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ३३ हजार ५०० होती. फेब्रुवारीमध्ये यात मोठय़ा प्रमाणात घट होऊन ती पाच हजारापर्यत कमी झाली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख हजारांच्याही खाली गेला होता. मार्चमध्ये तर हा आलेख पाचशेपर्यत घटला आहे. जानेवारीत राज्यात १० लाख ३८ हजार रुग्ण नव्याने आढळले होते, फेब्रुवारीमध्ये घट झाली असून सुमारे १ लाख ४४ हजार रुग्ण आढळले आहेत.
14 जिल्ह्यांमधील
निर्बंध केले शिथील
कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लावलेले निर्बंध हळू हळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला राज्य सरकारने 14 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आदी जिल्ह्यांचा यात समावेश आहे. मात्र मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना अ श्रेणीत येण्यासाठी लसीकरणाचा टक्का वाढवावा लागणार आहे. पहिला डोस घेण्याचे प्रमाण जास्त असले तरी दुसरा डोस घेण्यात जिल्हे मागे आहेत
युरोपातील सर्वात मोठ्या
अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला
युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने झापोरीझ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलाय. जगाला ज्या गोष्टीची भीती होती. ती आता घडतेय की काय अशा घडामोडी सध्या रशिया युक्रेन युद्धादरम्यान घडत आहेत. युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे.
SD social media
9850 60 35 90