पुण्यात वादळी पावसाची, शक्यता हवामान विभागाचा अंदाज

पुणे शहरात मंगळवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागातून वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास पुण्यात पावसाला (Rain) सुरुवात होईल. हा पाऊस मुसळधार स्वरुपाचा असू शकतो. त्यानंतर बुधवारी सकाळपासून पुण्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे मान्सूनचा पाऊस केरळच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 27 मे ते 2 जून या कालावधीत केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. तर साधारण 1 जूनच्या आसपास मान्सूनचे केरळात आगमन होईल. त्यानंतर 8 ते 10 जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात येऊन स्थिरावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

तौक्ते चक्रीवादळानंतर आता वायव्य समुद्रकिनाऱ्यावर यास चक्रीवादळ धडकणार आहे. ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या वादळाची निर्मिती झाली आहे. यादृष्टीने आता केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी वादळाच्या टप्प्यात असलेल्या राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. तसेच वादळाच्या काळात मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि इतर पथकांना तैनात केले जात आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर वायूसेना आणि नौसेनेला मदतीच्यादृष्टीने सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.