काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 54 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी माहिती पसरविल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं होतं. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कमलनाथ यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी कोरोनावरून भाजपवर टीका केली होती. आता कोरोनाला जगात ‘इंडियन कोरोना’ नावाने ओळखले जाईल, असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं. तसेच सरकारने लाखो लोकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा दावाही कमलनाथ यांनी केला होता. त्यांचं हे विधान आक्षेपाहार्य असल्याचं भाजपने म्हटलं आहे. भाजपने रविवारी दुपारी हे निवेदन गुन्हे अन्वेषण विभागाला दिलं होतं. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने संध्याकाळी कमलनाथ यांच्याविरोधात दोन कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार ही दोन्ही कलमे जामीनपात्रं आहेत.
कमलनाथ यांनी उज्जैनमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. जानेवारी 2020 मध्ये कोरोना आला. तेव्हा त्याला चायनीज कोरोना म्हटलं गेलं. चीनच्या लॅबमध्ये हा कोरोना तयार झाला आणि एका शहरातून हा कोरोना आला. आज आपण कुठे पोहोचलो आहोत ? ‘इंडियन कोरोना’ येईल म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात येणं टाळलं आहे. विद्यार्थी आणि भारतीय नागरिक ‘इंडियन कोरोना’ घेऊन येतील म्हणून त्यांना तिथेच रोखून ठेवलं आहे. जगभरात देश यामुळे ओळखला जात आहे. आता आपला देश महान राहिला नाही. आता भारत कोविडचा बनलेला आहे, असं ते म्हणाले होते. यापूर्वी टुलकिट प्रकरणी भाजप नेते संबित पात्रा यांना रायपूर पोलिसांनी नोटीस पाठवली होती. संबित पात्रा यांना चौकशीसाठी बोलावण्याकरिता ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे नेते आकाश शर्मा यांनीही तक्रार दाखल केली आहे.