मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. 6 महिने होऊनही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 मे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. या दिवशी देशभरात आंदोलनं होणार आहेत. याला काँग्रेसह देशातील 12 विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलाय.
संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत असतानाही सरकारने मागण्या मान्य न केल्याविरोधात देशभरात 26 मे रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर देशातील विरोधी पक्षांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. याबाबत 12 पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केलंय. काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “संयुक्त किसान मोर्चाने 26 मे रोजी देशभरात जाहीर केलेल्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा देतो. त्या दिवशी शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत आहेत.”
या पाठिंबा पत्रात विरोधी पक्षांनी सांगितलं, “12 मे 2021 रोजी आम्ही संयुक्तपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. यात सीमेवरील लाखो अन्नदात्यांना साथीरोगापासून वाचवण्यासाठी कृषी कायदे मागे घ्या. जेणेकरुन ते सीमेवरुन परतून भारतीयांसाठी आपलं अन्न पिकवण्याचं काम सुरु ठेऊ शकतील. आम्ही तात्काळ कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करतो. तसेच स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशीनुसार शेत मालाला हमीभावाची कायदेशीर तरतूद द्यावी, अशीही मागणी करतो. या मागण्यांवर सरकारने ताठरता सोडावी आणि तात्काळ शेतकऱ्यांसोबत चर्चेला सुरुवात करावी.