खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीची राहुल गांधींनी केली विचारपूस

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोरोना संसर्गानंतर सातव यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डॉक्टरांना फोन करुन राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईहून लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला पुण्याला बोलवण्याबाबत हालचाली सुरु आहेत.

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.

राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.